लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील मार्च १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याला २५ वर्षे कारावासाची शिक्षा भोगावीच लागेल, असे विशेष टाडा न्यायालयाने स्पष्ट केले. सरकारकडून शिक्षेत मिळत असलेली सवलत धरल्यास आपण शिक्षा पूर्ण केली आहे. त्यामुळे आपल्याला सोडण्याची तारीख कळवण्यात यावी, असा अर्ज त्याने न्यायालयात केला होता. मात्र, कारागृहातून लवकर बाहेर काढण्यास सालेम पात्र नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
सालेमने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे. त्यामुळे शिक्षेत सवलतीसाठी कोणतेही विशेषाधिकार देण्यास तो पात्र नाही, असे विशेष न्या. डी. व्ही. केदार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ११ जुलै २०२२च्या निकालाचा हवाला देत स्पष्ट केले. सालेम ज्या गुन्ह्यात गुंतला होता, त्याचे गांभीर्य पाहता शिक्षेचा कालावधी कमी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.
सालेमचा युक्तिवाद... nविशेष प्रसंगी किंवा चांगल्या वागणुकीबद्दल शिक्षेत देण्यात येणारी सवलत आपल्याला मिळावी आणि ती २ वर्षे १० महिने इतकी आहे. ती धरल्यास आपण शिक्षेची २५ वर्षे पूर्ण केली आहेत, हा सालेमचा युक्तिवाद टाडा न्यायालयाने फेटाळला. nपोर्तुगालने ११ नोव्हेंबर २००५ रोजी सालेमचे प्रत्यार्पण केले होते. टाडाच्या दोन प्रकरणांत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी २०२५ आणि ७ सप्टेंबर २०१७ रोजी त्याला जन्मठेपची शिक्षा ठोठावली होती.