बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा जबाब नोंदवण्यात आला आहे. विशेष न्यायदंडाधिकारी समृद्धी मिश्रा यांच्यासमोर सीआरपीसीच्या कलम ३१३ अंतर्गत अबू सालेमचा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 4 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सालेमला कडेकोट बंदोबस्तात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अबू सालेम उर्फ अब्दुल कयूम अन्सारी, त्याचे सहकारी परवेज आलम आणि समीरा जुमानी यांनी 1993 मध्ये लखनऊ पासपोर्ट कार्यालयात अकील अहमद आझमी यांच्या नावाने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. आरोपींनी या अर्जासोबत बनावट नाव आणि पत्त्याची बनावट कागदपत्रे जोडली होती आणि पासपोर्ट मिळवल्यानंतर त्याचा वापर केला होता. त्याचवेळी अबू सालेमला बनावट पासपोर्ट प्रकरणात मदत करणारा परवेझ आलम नावाचा आरोपीही न्यायालयात हजर झाला आणि त्याचा जबाब नोंदवला. डॉन अबू सालेम 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर त्याची कथित पत्नी समीरा जुमानीसह भारतातून पळून गेला होता आणि या प्रकरणाचा तपास केला असता अबू सालेम आणि त्याची पत्नी बनावट पासपोर्ट बनवून, नाव बदलून भारतातून पळून गेल्याचे आढळून आले.
बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अबू सालेमचा जबाब नोंदवला, पुढील सुनावणी ४ ऑगस्टला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 9:57 PM