वसमत (हिंगोली ) : तालुक्यातील कनेरगाव येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात मुलीने ग्रामीण पोलिसांकडे दिलेल्या पुरवणी जबाबानंतर आणखी १३ जणांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यातील आरोपींची धरपकड सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रभर केलेल्या धरपकड मोहिमेनंतर ८ जण पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. (Abuse of a minor girl, 8 arrested till; search continue in hingoli's wasmat.)
कनेरगाव येथील मुलीचा एप्रिल २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याठिकाणी तपासणीत ती मुलगी अगोदरच गरोदर असल्याचे समोर आले. त्यामुळे सदर मुलीला घटस्फोट देण्यात आला होता. या घटनेनंतर सदर मुलीने वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात तिच्यावर लग्नाअगोदर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल दिली.
तिच्या तक्रारीवरून या प्रकरणात मारोती भालेराव रा. कनेरगाव याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीस अटकही केली होती. तसेच पीडित मुलीने या प्रकरणात आणखी अनेकजण असून त्यानी अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तपास चक्रे फिरवणे सुरू केले. तपास अधिकारी डीवायएसपी यतीश देशमुख यांच्याकडे पुरवणी जवाब दिला. त्यामध्ये १२ जणांनी तिच्यावर वेगवेगळ्या वेळी अत्याचार केल्याचे नमुद केले.
पुरवणी जवाबानंतर देशमुख यांनी तातडीने कारवाई केली. जवाबप्रमाणे पुन्हा १२ आरोपींविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर लगेच डीवायएसपी देशमुख यांनी आरोपींच्या शोधासाठी वसमत ग्रामीण पोलीस ठाणे, व शहर पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार केले. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बर्गे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.या पथकाने सोमवारी रात्री ९ वाजल्यापासून शोधमोहीम सुरू केली. रात्रभर ही मोहीम राबवली. या मोहिमेत कनेरगाव, अर्धापूर, नांदेड या भागात लपलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळून त्याना जेरबंद केले. यात काही प्रतिष्ठित म्हणवणाऱ्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात अनेक महाभागांनी पुढाकार घेतला, तर अनेकांनी अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे सांगून प्रकरण दडपून टाकत आजवर या प्रकरणावर पडदा टाकला होता.
डीवायएसपी यातिश देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेऊन आरोपींची गय करू नका असे आदेश दिल्याने, पोलीस पथकांनी यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कनेरगावातील अनेकांचे कारस्थान समोर येणार असल्याचे एवढे निश्चित आहे. या आरोपींमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, या नावावरून अनेकांनी तर्कवितर्क लावले. यातील सर्व आरोपी अटक होईपर्यंत नावे गोपनीय ठेवली असल्याने, याप्रकरणी अनेकजण भूमिगत झाल्याचेही समोर येत आहे.