खामगाव (बुलढाणा) : ग्रामसेवकाची बदली करून दुसऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी महिला सरपंचाने केल्याने संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्याने कार्यालयातच त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या पतीला मारहाण करून कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे बुधवारी सकाळी घडला. याप्रकरणी तक्रारीवरून सदस्य अनिल काशिनाथ पाटील याच्यावर मलकापूर ग्रामीण पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
दाताळा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पूजा प्रसाद पाटील यांनी त्याबाबतची तक्रार पोलिसांत दिली. त्यामध्ये सदस्य अनिल काशिनाथ पाटील याच्याकडून नेहमी काम त्याच्या मनाप्रमाणेच करावी, असा आग्रह असतो. तसेच गावाच्या विकासकामात सचिव सुधीर ढोले यांचे लक्ष नसल्याने सरपंच यांनी ग्रामसेवक बदलवून देण्याची मागणी पंचायत समितीमध्ये केली. या कारणामुळे आरोपी अनिल पाटील यांना राग आल्याचे म्हटले आहे.
बुधवारी सकाळी सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात बसून होत्या. त्यावेळी अनिल काशिनाथ पाटील याने अश्लील शिवीगाळ करत दादागिरीची भाषा केली. तसेच त्यांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. ग्रामपंचायत बाहेर जाऊन सरपंच पतीला दोन-तीन चापटा मारल्या व शिवीगाळ करत निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या कलम २९४, ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाॅ सचिन दासर करीत आहेत.