मूर्तिजापूर : येथील एका लॉजमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करणारा आरोपी रिजवान शहा (२६) राहणार सोनोरी बपोरी याला विशेष सत्र न्यायालयाने २१ जानेवारी रोजी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
१ मे २०१८ ते २१ मे २०१९ दरम्यान विविध आमिषे दाखवून हिंगणगाव (कासारखेड) ता. धामणगाव रेल्वे जि. अमरावती येथील रहिवासी असलेली व सोनोरी बपोरी येथे आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याच गावातील रिजवान उर्फ रमजान शहा उर्फ रज्जू बिस्मिल्ला शहा याने विविध आमिषे देऊन सदर मुलीवर उपरोक्त कालावधीत मूर्तिजापूर येथील एका लॉज मध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला. झाला प्रकाराबाबत पीडीतेने पोलीसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीसांनी आरोपी विरुद्ध कलम ३७७ व पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संगीता गावडे यांनी प्रकरण विशेष सत्र न्यायालयात दाखल केले होते.
या प्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी यात ७ साक्षीदार तपासून आरोपी रिजवान उर्फ रमजान शहा उर्फ रज्जू बिस्मिल्ला शहा याला दोषी ठरवीत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कलम ३७७ अंतर्गत आजन्म कारावास, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महीने साधा कारावास, कलम ३५४ (ड) ३ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, कलम ५०६ दोन वर्षे सक्त मजूरी, ५ हजार दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, कलम ३,४ पोक्सो अंतर्गत आजीवन कारावास कारावास व ५० हजार रुपये दंड दंड न भरल्यास ६ महीने साधा कारावास, कलम ७,८ पोक्सो ५ वर्षे सक्त कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महीना साधा कारावास, कलम ११,१२ पोक्सोमध्ये ३ वर्षे सक्त कारावास व ५ हजार रुपये दंड दंड न भरल्यास १ महीना साध्या कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. आरोपीने १ लाख २० हजारांच्या दंडा सह आजीवन कारावास या सर्व शिक्षा एकत्रीतपणे भोगायच्या आहेत. पीडित बालकाच्या वतीने सरकारी वकिल के. बी खोत यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी प्रवीण पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय भारसाकळे सहकार्य केले.