लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज देयकाची थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास देयकाची रक्कम न देता शिवीगाळ केल्या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी दोन वीज ग्राहकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.महावितरणच्या बिनाकी उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारे राहुल मोहाडीकर यांना थकबाकीदार वीज ग्राहकांकडून देयकाची रक्कम वसूल करण्याची जवाबदारी सोपविण्यात आली आहे. रोज कार्यालयातून मिळणारी थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी घेऊन वीज ग्राहकांना देयकाचे पैसे भरण्याचे आवाहन करतात. आज नेहमी प्रमाणे यशोधरा नगर परिसरात आपले काम करीत असताना वीज ग्राहक मोहम्मद इलियास याने आपण थकबाकीची रक्कम भरण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. राहुल मोहाडीकर यांनी वीज पुरवठा खंडित करून मीटर जप्त करण्याची कारवाई केली. या घटनेमुळे चिडलेल्या मोहम्मद इलियास याने राहुल मोहाडीकर यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. राहुल मोहाडीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलिसांनी वीज ग्राहक मोहमद इलियास याच्या विरोधात भादंवि कलाम ५०६ आणि २९४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या अन्य एका प्रकरणात यशोधरा नगर येथे राहणाऱ्या सचिन निखारे या वीज ग्राहकाने थकबाकीची रक्कम भरण्यास नकार देऊन महावितरण कर्मचारी राहुल मोहाडीकर यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात भादंवि कलाम ५०६, ५०७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गुन्ह्या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक साखरे पुढील तपास करीत आहेत.
महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ,२ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 9:09 PM