साकोली (भंडारा) : एका घराचे अतिक्रमण काढण्यास गेलेल्या नगरपरिषदेच्या पथकाला विरोध केल्याप्रकरणी साकोलीच्या नगराध्यक्ष, नगरसेवकांसह तब्बल १३ जणांविरूद्ध बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. नगराध्यक्षाविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नगराध्यक्ष धनवंता ईश्वरदत्त राऊत, नगरसेविका अनिता किशोर पोगडे नगरसेविका लता कापगते, डॉ. अजय तुमसरे, माजी सरपंच तथा किसोन आघाडीचे जिल्हा महामंत्री भोजेंद्र कापगते, व्यापारी हरिष एकनाथ पोगडे, चंद्रशेखर पोगडे, आदिनाथ नंदागवळी, विनायक देशमुख, डॉ. अनिल मारवाडे, प्रती डोंगरवार आणि व्यापारी प्रखर रामनारायण गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. साकोली नगरपरिषदेच्यावतीने २१ मे रोजी हरिष एकनाथ पोगडे यांनी पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यावर एक मोठी खोली व इतर बांधकाम करून अतिक्रमण केले. ते अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले होते. अतिक्रमण काढण्यास नगराध्यक्ष धनवंता राऊत यांच्यासह तेथे उपस्थितांनी विरोध केला. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी बुधवारी साकोली पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलिसांनी नगराध्यक्षासह १३ आणि इतर ५०, ६० जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू होती. तेव्हा मोठे वादंग झाले होते. त्यावेळी काही राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून वाद मिटविला होता. मात्र आता तब्बल सहा दिवसानंतर या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हे दाखल झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
विश्वासात घेतले नाही - नगराध्यक्ष राऊतमुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिलेली तक्रार खोटी आहे. आमच्या पैकी कुणीही त्यांच्या अंगावर धावून गेलेले नाही. अतिक्रमण काढण्यासंदर्भात नगरपरिषदेत कुठलाही ठराव झाला नाही. मुख्याधिकाऱ्यांनी विश्वासात न घेता अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला, असे साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत यांनी सांगितले.नाल्यावरील अतिक्रमण काढणारच - मुख्याधिकारी मडावीगतवर्षी पावसाळ्यात साकोली पुर्वी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे यावर्षी नाली सफाईचे कामे पावसाळ्यापुर्वी करणे आवश्यक आहे. नाल्यावरील अतिक्रमण काढणे आवश्यक आहे, असे साकोलीच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सांगितले.