देवेंद्र पाठक, धुळे: गल्लीत शिवीगाळ का केली, असा जाब विचारत एकाला पकडून चांगलेच झोडपून काढल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील देगाव गावात मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी दुपारी दीड वाजता ८ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल झाला.
शिंदखेडा तालुक्यातील देगाव गावातील रहिवासी भरत अण्णा पाटील (वय २९) हा तरुण गल्लीत उभे राहून शिवीगाळ करत होता. काही कारण नसताना त्याच्याकडून होणारी शिवीगाळ गावातील काही जणांना खटकली. त्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्नही केला. पण, तो तरुण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यानंतर एका जमावाने गैरकायद्याची मंडळी जमवून भरत पाटील यांचे घर गाठले. त्याला त्याच्या घराच्या अंगणात पकडून शिवीगाळ करत हाताबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात भरत पाटील याला मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाली. मारहाण केल्यानंतर जमावाने जिवे ठार मारण्याची धमकी देत तिथून मार्गस्थ झाला.
जखमी अवस्थेत भरत पाटील याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर बुधवारी दुपारी दीड वाजता शिंदखेडा पोलिस ठाण्यात त्याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, देगाव गावातीलच ८ जणांविरोधात भादंवि कलम ३२४, १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. जी. ठाकरे तपास करीत आहेत.