नागपूर - एसीबीच्या पथकाने मंगळवारी कारवाईचा डबल धमाका केला. एकीकडे महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या तर दुसरीकडे वाहतूक शाखेच्या पोलिसाला लाच मागण्याच्या आरोपाखाली जेरबंद केले. एसबीने एकाच दिवशी दोघांच्या विकेट घेतल्याने लाचखोरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून सेवा देणारे तक्रारदार ३१ मार्चला निवृत्त झाले. त्यांना नंतर आजाराने घेरले. निवृत्तीनंतर त्यांची पत्नी निवृत्तीवेतन आणि ईतर हक्काचे लाभ मिळावे म्हणून धरमपेठ झोन २ च्या आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक राजेंद्र शंकरराव गजभिये (वय ५५) यांच्याकडे चकरा मारू लागली. निवृत्ती वेतनासोबतच शिल्लक सुट्यांचे पैसे वाढवून देण्याची बतावणी करून गजभियेने या महिलेला ३ जून रोजी १० हजारांची मागणी केली.
विशेष म्हणजे, महिलेचे पती (निवृत्त कर्मचारी) आजारामुळे अंथरूणाला खिळले आहे. तर, सदर महिला नुकतीच कोरोनातून बरी झाल्याने त्यांची तीव्र आर्थिक कोंडी झाली आहे. आमच्यासाठी १० हजारांची रक्कम खूप जास्त आहे, असे सांगून तिने गजभियेला आपल्या हक्काचे लाभ तातडीने मिळावे, यासाठी मागणी केली. मात्र, गजभिये लाचेच्या रक्कमेसाठी अडून बसला होता. त्यामुळे पीडित महिला सरळ एसीबीत पोहचली. तिची तक्रार ऐकून घेतल्यानंतर एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी उपअधीक्षक योगिता चाफले यांना शहानिशा करण्याचे आदेश दिले. चाफले यांनी आज मंगळवारी तक्रारीची शहानिशा केली.
अन् गजभिये अडकला
गजभिये लाचेची रक्कम मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात आज कारवाईचा सापळा लावला. त्यानुसार, उपअधीक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्वात नायक रविकांत डहाट,अनमोल मनघरे, आचल हरगुळे, अस्मिता मेश्राम आणि प्रिया नेवरे यांनी दुपारी ४ वाजता गजिभयेचे कार्यालय गाठले. ठरल्याप्रमाणे महिलेने गजभियेला लाचेचे १० हजार रुपये दिले. त्याने ते स्विकारताच त्याच्या मुसक्या आवळल्यात आल्या. गजिभयेविरुद्ध अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिकडे एका पथकाने त्याच्या घराचीही झडती घेतली. त्यात फारसे काही हाती लागले नसल्याचे एसीबीच्या अधीकाऱ्यांनी लोकमतला सांगितले.
ऑटोचालकाने घेतली ‘ऑन डिमांड विकेट’
दुसरी कारवाई प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तक्रारदाराच्या ऑटोला १० मे रोजी शंकरनगर चाैकाजवळ एका एम्बुलन्सची धडक बसली होती. त्यावेळी ऑटोचे मोठे नुकसानही झाले होते. अशात पोलीस शिपायी बिपीन शंकरराव महाजन (वय ३२) याने ऑटोचालकाला ५०० रुपयांची लाच दे अन्यथा तुझा ऑटो चेंबरला लावून २ हजारांच्या दंडाची कारवाई करेन, अशी धमकी दिली होती. त्यावेळी २०० रुपयांचे चालानही कापले होते. महाजन ५०० रुपयांच्या लाचेसाठी कारवाईची सारखी धमकी देत असल्याने आठ दिवसांपूर्वी ऑटोचालकाने त्याच्याविरुद्ध एसीबीकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कारवाईचा सापळा लावला. मात्र, संशय आल्यामुळे महाजन लाचेची रक्कम घेण्यास टाळाटाळ करू लागला. तो लाचेची रक्कम स्विकारणार नाही, हे लक्षात आल्यामुळे एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी आरोपी महाजनविरुद्ध लाच मागण्याची (ऑन डिमांड) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मंगळवारी दुपारी उपअधीक्षक नरेश पार्वे यांच्या नेतृत्वात लक्ष्मण परतेती, भागवत वानखेडे, सचिन किन्हेकर आणि शारिक शेख यांनी लाचखोर महाजनला जेरबंद केले.