धामणगाव रेल्वे (अमरावती) - सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या २५ वर्षीय कंत्राटदाराला एमबी बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी दोन शासकीय अभियंत्यांकडून लाचेची मागणी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ नोव्हेंबर रोजी कारवाई करून उपअभियंत्याला धामणगावातील नेहरूनगर येथील त्याच्या निवासस्थानाहून लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. तक्रारीवरून अन्य अभियंत्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा चांदूर रेल्वे येथील उपअभियंता किशोर हरिभाऊ साकुरे (५७) व धामणगाव रेल्वे पंचायत समिती बांधकाम विभागाचा शाखा अभियंता गजेंद्र जयसिंग परमाल अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराने केलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे एमबी बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी सेक्शन इंजिनीअर गजेंद्र जयसिंग परमाल याने ७ ऑगस्ट रोजी दोन टक्के दराने ४००० रुपये लाचेची मागणी केली आणि ८ व १४ ऑगस्ट रोजी ही रक्कम स्वीकारली. याच एमबी बुकवर उपअभियंता किशोर हरिभाऊ साकुरे याची स्वाक्षरी घेण्यासाठी तक्रारदार १४ ऑगस्ट रोजी गेले असता, त्यानेसुद्धा दोन टक्के दराने ४००० रुपये व पूर्वीच्या पेव्हरच्या कामातील ५००० रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. यानंतर धामणगाव रेल्वे येथील नेहरूनगरातील साकुरे याच्या घरी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून नऊ हजारांची लाच घेताना साकुरेला ४ नोव्हेंबर रोजी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.दत्तापूर पोलीस ठाण्यात हे प्रकरण वर्ग करण्यात आले असून, वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, हवालदार माधुरी साबळे, नायक पोलीस शिपाई सुनील वºहाडे, पोलीस शिपाई अभय वाघ व महेंद्र साखरे आणि चालक नायक पोलीस शिपाई चंद्रकांत जनबंधू यांनी कारवाई केली.
बांधकाम उपअभियंत्याला लाच घेताना एसीबीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 8:28 PM
शाखा अभियंताही ताब्यात
ठळक मुद्दे तक्रारीवरून अन्य अभियंत्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.दोन टक्के दराने ४००० रुपये लाचेची मागणी केलीतक्रारदाराकडून नऊ हजारांची लाच घेताना साकुरेला ४ नोव्हेंबर रोजी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.