वर्धा : रमाई घरकुल योजनेचा वर्धा प्रस्ताव पंचायत समितीत पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना झाडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे सदस्य यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यापोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली.
ही कारवाई सोमवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. झाडगाव येथील एका व्यक्तीला रमाई घरकुल योजनेंतर्गत घरकुल मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक सचिन भास्कर वैद्य आणि सदस्य नरेंद्र वामन संदूरकर यांनी गावातीलच एका लाभार्थ्याला १५ हजार रुपयांची मागणी केली होती. बौद्ध समाज बांधवांना घरकुल योजना मिळण्यासाठीचा प्रस्ताव वर्धा पंचायत समितीकडे पाठविण्यासाठी ही डील करण्यात आली होती.
लाभार्थ्याने हा प्रस्ताव मान्य करीत १५ मार्च रोजी १५ हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार २१ रोजी पैसे देण्याचे ठरले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातीलपोलिसांनी सापळा रचून ग्रामसेवक सचिन वैद्य आणि सदस्य नरेंद्र संदूरकर यांना लाचेची १५ हजार रुपयांच रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सुहासिनी सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.