जयपूर - राजस्थानच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ऑपरेशन AUDI सुरू आहे. या मोहिमेतून जयपूरच्या बांधकाम विभागात काम करणारे इंजिनिअर हरिप्रसाद मीणा यांना उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती जमा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी इंजिनिअरकडे कमाईपेक्षा २०० टक्के अधिक म्हणजे ४ कोटीहून अधिक मालमत्ता आहे असं तपासात पुढे आले.
एसीबीकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, एका गोपनीय माहितीत हरिप्रसाद मीणा यांच्याकडे शासकीय सेवेत असताना त्यांच्या कमाईपेक्षा अधिक संपत्ती असल्याचं कळलं. त्यात महागड्या लग्झरी कार जसं AUDI, स्कोर्पिओ, फोर्ड एंडेवर, रॉयल एनफिल्ड बाईक ज्याची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. त्याशिवाय परदेश दौरे, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम यासाठी त्यांनी तब्बल ४५ लाख रुपये खर्च केल्याचं तपासात समोर आल्याने अधिकारीही हैराण झालेत.
हरिप्रसाद मीणा यांनी जयपूरच्या महल रोड येथील यूनिक एम्पोरियम, यूनिक न्यू टाऊन इथं ३ लग्झरी अपार्टमेंट खरेदी केलेत. ज्याची किंमत १.५ कोटी इतकी आहे. त्यांच्याकडे दौसा जिल्ह्यातील लालसोट इथल्या बागडी गावात आलिशान फार्म हाऊसही आहे. आरोपी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या १९ बँक खात्यात कोट्यवधीच्या उलाढाली असल्याचे कागदपत्रे सापडली आहेत. बँकांकडून कर्ज घेऊन संपत्ती बनवली, वाहन खरेदी केलेत. ज्याची परतफेड अगदी कमी कालावधीत झाली आहे असं एसीबीने सांगितले.
दरम्यान, जयपूर शहरातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंह या प्रकरणाचा तपास करत आहेत. एसीबीनं हरिप्रसाद मीणा यांच्या जयपूरसह ५ ठिकाणांवर धाड टाकली होती. ज्यात यूनिक एम्पोरियम, यूनिक न्यू टाऊन, फार्म हाऊस, कार्यालय आणि भाड्याने घेतलेले घर यांचा समावेश आहे.