लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल गुन्हयातील तपासाच्या अनुषंगाने यातील आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नथु राठोड यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरात ३ कोटी ४६ लाख १० हजार इतकी बेहिशोबी रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
तक्रारदार यांचे आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे घर असून सदर घराची दुरूस्तीकरीता परवानगी मिळण्यासाठी नथु राठोड, मुख्य कार्यकारी अधिकरी ( (आरे) दुग्ध वसाहत, गोरेगाव पूर्व, मुंबई तथा उप आयुक्त प्रशासन (अतिरिक्त कार्यभार), वरळी दुग्ध डेअरी ) यांची भेट घेतली असता त्यांनी आरेचा शिपाई अरविंद तिवारी याची भेट घेण्यास सांगितले. तक्रारदार यांनी अरविंद तिवारी यांची भेट घेतली असता त्यांनी नथु राठोड याचे वतीने तक्रादाराकडे या कामाकरीता ५० हजार इतक्या लाचेची रक्कम मागणी केली. फिर्यादी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १४ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई या कार्यालयात प्रत्यक्ष येवून लेखी तक्रार दिली.
१९ मेला फिर्यादी यांना नथु राठोड यांच्या वरळी दुग्ध डेअरी येथील कार्यालयात भेटण्यास पाठवून तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता नथु राठोड यांनी फिर्यादी यांना पुन्हा अरविंद तिवारी यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार २४ मे रोजी फिर्यादी यांना राठोड यांच्या आरे दुग्ध डेअरी गोरेगाव कार्यालयात शिपाई अरविंद तिवारी यांची भेट घेण्यास पाठवून पडताळणी केली असता राठोड यांच्या वतीने तिवारीने ५० हजार इतक्या रक्कमेच्या लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान शिपाई अरविंद तिवारी यांनी फिर्यादी यांच्याकडून लाचेची रक्क्म ५० हजार स्वीकारून फिर्यादी यांना नथु राठोड यांच्या समक्ष हजर करून त्याची सहमती घेतल्यावरून रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.