गुलबर्गा - गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आपल्या गावी माघारी जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खाजगी बसला गुलबर्गा येथे झालेल्या भीषण अपघातात बसने पेट घेतल्यामुळे ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, हैदराबादचे रहिवासी असलेले प्रवासी स्थानिक ऑरेंज या संस्थेच्या खाजगी बसने गेल्या दोन दिवसापूर्वी गोव्याच्या पर्यटनासाठी गेले होते. गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आज शुक्रवारी ते हैदराबादकडे निघाले होते. यावेळी गुलबर्गा शहराच्या बाहेरील सोलापूर -हैदराबाद राज्य महामार्गावर कमलापूर गावाजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरला बसने जोराची धडक दिली. या अपघातात बसने पेट घेतल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली.
बसमधून एकूण २९ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर बसने अचानक पेट घेतल्याने २० प्रवासी गंभीर जखमी झाले तर उर्वरित नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. जखमींना गुलबर्गा शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बसची आग आटोक्यात आणली. या भीषण अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.