पाटणा - बिहारमधील हाजीपूरमध्ये एक प्रवासी बस मोठ्या दुर्घटनेची शिकार झाली. उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने या बसला आग लागली. बसला आग लागताच घटनास्थळावर एकच धावपळ उडाली. त्यानंतर घटनास्थली पोहोचलेल्या अग्निशमन दलाने खूप प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या दुर्घटनेत बसचालक गंभीरीत्या जखमी झाला आहे.
उच्च दाबाच्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने बसमध्ये करंट आला. तसेच आग लागल्यानंतर चालकाने बसमधून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात तो गंभीरपणे होरपळला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाजीपूर-पाटणा रामाशिष चौक बसस्टँडजवळ ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाची बाब म्हणजे हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये कुणीही प्रवासी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
ही बस सरैया येथून हाजीपूर येथे आली होती. तसेच माघारी जाण्यासाठी ड्रायव्हर निघाला होता, तेव्हाच हा अपघात घडला. पाटणा येथे जाण्यासाठी ड्रायव्ह बस पुढे आणत होता. तेव्हाच बसवरून जाणारी हायटेन्शन तार बसला लागली आणि बसला आग लागली. बसला आग लागताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, ही आग कशी लागली याचा तपास केला जात असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.