लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहरातील वंजारपट्टी नाका येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणंपुलावर दोन अल्पवयीन मित्र भरधाव वेगाने स्पोर्ट बाईक चालवत असतानाच कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे.
जाहिद शेख (१४) असे अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे तर कैफ दिंनशा सिद्दीकी (१३) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुबंईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही अल्पवयीन मित्र गुरुवारी पहाटेच्या सुमारास भिवंडीतील मिल्लतनगर मधून वंजारपट्टी नाका जाण्यासाठी बाईकवरून निघाले होते. त्यावेळी त्यांची बाईक भरधाव वेगाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणंपुलावर येताच बाईकस्वराचे नियंत्रण सुटले आणि बाईकने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात जाहिदचा मृत्यू झाला.
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच निजामपूरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने दोघांना गंभीर जखमी अस्वस्थेत वंजारपट्टी नाक्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जाहिदचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता तर कैफ गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.