केज (जि. बीड) : प्रेयसीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात जाणारा प्रियकर दुचाकी व रिक्षाच्या अपघातात ठार झाला, तर प्रियकराच्या मृत्यूमुळे प्रेयसीने पूर्वीच्या पतीकडे मदत मागितल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला व मृतदेह शिंदी ते विडा रस्त्याच्या कडेला टाकून दिला. हा प्रकार सकाळी साडेआठ नंतर उघडकीस आल्यानंतर केज पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत गुन्ह्याची उकल करीत खूनप्रकरणी आरोपी पतीला जेरबंद केले.
तालुक्यातील नामेवाडी येथील शहादेव आश्रुबा वायबसे याचा कवितासोबत बाल विवाह झाला होता. कविता शहादेवपेक्षा चार वर्षांनी मोठी होती. दोघे ऊस तोडणीसाठी कारखान्यावर जात होते. त्याच वेळी तिचे संबंध मुकादम संतोष दगडू वाघमारे रा. विडा याच्याशी आल्यानंतर ती मागील काही वर्षापासून केज येथे समता नगर भागात भाड्याच्या खोलीत संतोष वाघमारे सोबत राहत होती. २८ आॅगस्ट रोजी संतोष वाघमारे व कविता शहादेव वायबसे या दोघांत वाद झाल्याने कविताने संतोष वाघमारे विरोधात केज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अत्याचार व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यात पोलिसांनी संतोष यास अटक केली होती.
जामिनावर सुटल्यानंतर त्याने कविताला मस्साजोग येथे रविवारी रात्री भेटण्यास बोलावले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाल्याने संतोष रागाच्या भरात निघून गेला. मस्साजोगपासून काही अंतरावर दुचाकी व रिक्षाचा अपघात होऊन संतोष ठार झाला. ही माहिती समजल्यानंतर कविता हिने पती शहादेव वायबसेकडे मदत मागितली. शहादेवने कविताला रस्त्यावर बोलावून घेत रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिचा गळा दाबून व स्कार्फने फाशी देऊन खून केला.
केज पोलिसांना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शिंदी ते विडा रस्त्यावर कविताचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत ओळख पटविली. शवविच्छेदनानंतर कविता शहादेव वायबसे हिचा मृत्यू गळा दाबून व स्कार्फने आवळून झाल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी दिला. अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचा अपघात व फिर्यादी महिलेचा मृत्यू यामुळे पोलिसांना आधीच संशय बळावला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
अवघ्या बारा तासांत प्रकरणाचा छडापोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक अशोक आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलीस निरीक्षक पुरु षोत्तम चोबे, सपोनि मुंडे व कर्मचाऱ्यांनी तपासचक्र वेगात फिरवित अवघ्या बारा तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघड केला. शहादेव वायबसे याने पत्नीचा खून केला असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अशोक आम्ले यांनी दिली.