अकोला : मंगरुळपीर येथील एका व्यापाऱ्याचे धान्याचे तीन ट्रक सोडण्यासाठी सुमारे ९० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातील ठाणेदाराच्या वाहनचालकास ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केल्यानंतर ट्रक पकडण्यासाठी २० आॅगस्ट रोजी त्याच्यासोबत असलेला खासगी इसम अब्दुल जुबेर शेख हसन यास अकोला एसीबीने शनिवारी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ३१ आॅगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान या दोघांनी ४० हजारांच्या लाचेव्यतिरिक्त १० हजार रुपयांची रक्कम ट्रक पकडला त्यावेळीही घेतल्याची माहिती समोर आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एका ५४ वर्षीय व्यापाºयाची धान्याची तीन वाहने सोडण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनमध्ये चालक पदावर कार्यरत असलेला तसेच अकोल्यातील जुने शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी असलेला वसीम करीम शेख या लाचखोर पोलीस कर्मचाºयाने त्याचा साथीदार अब्दुल जुबेर शेख हसन या दोघांनी तब्बल ९० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तसेच सदरचे वाहन दर महिन्याला सोडण्यासाठी महिन्याकाठी १५ हजार रुपयांचा हप्ताही मागितला होता. अकोला एसीबीने लाचखोर पोलीस कर्मचारी वसीम करीम शेख याला ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. तर चौकशीमध्ये अब्दुल जुबेर शेख हसन हा आणि वसीम करीम शेख या दोघांनी २० आॅगस्ट रोजी रात्री २ वाजता एम एच ०६ एझेड १९३३ क्रमांकाच्या कारने येउन हे ट्रक पकडले होते. यावेळी सदर दोघांनी ट्रक चालकाकडून १० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर पुन्हा पैशाची मागणी केल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली तर त्याच्या साथीदारास शनिवारी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ३१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर यापुर्वी अटक केलेला पोलिस कर्मचारी वसीम करीम शेख याला न्यायालयाने यापुर्वीच ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.