मुंबई - उसन्या स्वरूपात घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे राजकोटच्या व्यावसायिकाने दोन मध्यस्थांचे अपहरण केले. मात्र, सतर्क पोलीसांमुळे त्याचा हा कट फसला आहे. डी. बी. मार्ग पोलीसांनी या व्यवसायिकासह त्याच्या तीन साथीदारांना मंगळवारी अटक केली.
मुंबईतील दिनेश शहा या हिरे व्यापाऱ्याने काही दिवसांपूर्वी राजकोट येथील शब्बीर खान (वय ४७) या व्यावसायिकाकडून दहा लाख रुपये घेतले. यावेळी अनिल राठोड आणि त्याचा मित्र साक्षीदार होते. घेतलेल्या पैश्यापैकी सहा लाख रुपये शहा यांनी परत केले. मात्र, उर्वरित चार लाख रुपये देण्यास शहा टाळाटाळ करीत होते. शब्बीर खान याने पाठपुरावा केला. मात्र शहा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याने मध्यस्थ असलेल्या अनिल राठोड आणि त्याच्या मित्राला संपर्क केला. पण त्यांनीही हात झटकले. त्यामुळे शब्बीर खान आणि त्याच्या साथीदारांनी मंगळवारी राठोड आणि त्याचा मित्र धर्मेश सागरला गाडीत कोंबले. कारमधून घेऊन जात असताना अपहरण केलेल्या दोघांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ड्युटीवर असलेले ताडदेव वाहतूक पोलिस हवालदार प्रमोद पद्मन यांच्या कानावर पडला. त्यांनी हा प्रकार तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला कळविला. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच गावदेवी पोलिसांच्या गस्ती गाडीवर असलेल्या कॉन्स्टेबल संतोष जगदाळे, इथापे यांनी पाठलाग करून करमायकल जंक्शनवर त्यांना गाठले. दोन व्यापाऱ्यांची त्यांच्या तावडीतून सुटका केली आणि राजकोटचा व्यावसायिक शब्बीर याच्यासह अक्रम शेख (वय - ४५), बाबू कुंचीकुर्वे (वय - ४७) आणि लक्ष्मण कुंचीकुर्वे (वय - ३७) या त्याच्या साथीदारांना डी. बी. मार्ग पोलीसांच्या हवाली केले. चौघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्यांना अटक केली.