बीड : अंबाजोगाई ठाण्यात दाखल एका गुन्ह्यातील २१ वर्षांपासून फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हैद्राबाद येथे जेरबंद केला. तो त्याचे अस्तित्व बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. आतापर्यंत पोलिसांना गुंगारा देऊन तो फरार होता. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १९९७ मध्ये नकली नोटांशी संबंधित फसवणुकीच्या एका गुन्ह्यात सायमन बाबुराव कोडीकर (४६, रा. लालवाडी बिदर, चितापूर जिल्हा गुलबर्गा) याच्याविरुद्ध कलम ४८९ (ब), ४८९ (क), ४८९ (ड), ४२०, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल होता. मात्र तो अनेक दिवसांपासून फरार होता.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीदरम्यान वॉन्टेड आणि फरार आरोपींचा आढावा घेतला होता. बीड जिल्हा अभिलेख्यावरील संख्या कमी करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेला वॉन्टेड व फरार आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यात पोलिसांची मोहीम चालू आहे. २८ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी सायमन बाबुराव कोडीकर हा हैदराबाद येथे असल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना करण्यात आले. हैदराबाद येथे जाऊन आरोपीची माहिती काढली असता तो लिंगमपल्ली रेल्वे स्टेशन, हैदराबाद येथे असल्याचे समजले. त्या ठिकाणी पथकाने ३१ जानेवारी रोजी सापळा रचून सायमन कोडीकर यास अटक केली.