पिंपरी : गुटखा वाहतूक प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने धूम ठोकली आहे. पोलीस चौकीत पोलिसाला धक्का देऊन खिडकीतून उडी मारून त्याने पलायन केले आहे. शिरगाव येथे बुधवारी (दि. ३१) रात्री पावणेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीला पोलिसांनी पकडले.
करम हौशीयतअली शेख (वय २९, रा. भिवंडी, ठाणे), असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा मुंबई येथून हडपसर येथे गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मंगळवारी (दि ३०) सापळा रचला. मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाच्या सोमाटणे फाटा येथील सब -वेवर आरोपी शेखला सामाजिक सुरक्षा पथकाने पकडले. त्याच्याकडून १२ लाख ३० हजार ५६० रुपये किमतीचा गुटखा, तीन हजार ३०० रुपये रोख, ५०० रुपये किमतीचा मोबाईल फोन, आठ लाख २० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन, असा एकूण २० लाख ५४ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी शेख याला अटक करण्यात आली. त्याला बुधवारी वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलीस कोठडीत असल्याने शिरगाव पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपी शेख याला शिरगाव पोलीस चौकीत आणले. त्यावेळी रात्री पावणे नऊच्या सुमारास आरोपी शेख पळून जाऊ लागला. त्यावेळी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक गाडीलकर यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना धक्का देऊन पोलीस चौकीच्या मागच्या खिडकीतून उडी मारून आरोपी शेख पळून गेला. धामणी गावाच्या रस्त्याने आरोपी शेख रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.