मुंबई - 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीसह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी फसवणूकीच्य गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मोहम्मद सर्फराज एहशाज उर्फ अमर अनुप खन्ना (38) आणि किशोर नाथानी (54) अशी या आरोपींची नावे आहे. या दोघांनी ब्रिटनच्या एका व्यवसायिकाला भारतात व्यवसाय सुरू करून देताना 19 कोटी रुपयांना गंडवल्याचे उघड झाले आहे.
भारतीय वंशज असलेले अमरजित सिंग उभी (69) हे मागील 21वर्षांपासून ब्रिटनमध्ये रहात आहेत. उभी यांनी ब्रिटनचे नागरिकतत्व स्वीकारले असून उभी हे ब्रिटनमध्ये 'फाँरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट' नावाची कंपनीत वितरकाचे काम करायचे. 1998 मध्ये या कंपनीला भारतात व्यवसाय करायचा असल्याने त्याची जबाबदारी त्यांनी उभी यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे उभी हे 1998 मध्ये भारतात रहायला आले. मुंबईतल्या सांताक्रूझ परिसरात त्यांनी सर्व परवानग्या घेत 2000 मध्ये कंपनीचे कार्यालय सुरू केले. याच दरम्यान त्यांची ओळख ही दोन्ही आरोपीशी झाली होती. या दोघांनी उभी यांना भारतात कंपनीचे विविध ठिकाणी कार्यालय आणि बिझनेस वाढीच्या नावावर वेळोवेळी पैसे उकळत उभी याच्याजवळून तब्बल 19 कोटी 22 लाख 24 हजार 556 रुपये उकळले. या फसवणूकीसाठी आरोपींनी नातेवाईक आणि भावाच्या खात्याचा वापर केला आहे. तसेच उभी यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याच्या व्यवहाराबाबतचा एक व्हिडिओ ही आरोपींनी बनवला आहे. मात्र, काही दिवसांनी दोघांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर उभी यांनी वांद्रे पोलिसात धाव घेत 15 जानेवारी 2018 रोजी तक्रार नोंदवली.
या दोघांविरोधात या पूर्वी देखील बांगूर नगर, वर्सोवा आणि गुन्हे शाखेत विविध फसवणूकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 9 च्या पोलिसांनी आज सकाळी या दोघांना ही फसवणूकीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. यातील सर्फराज या आरोपीवर ज्येष्ठ अभिनेत्रीवर बलात्कार, खंडणी आणि फसवणूक केल्याची तक्रार ही असल्याचे पोलिसांनी सांगितले.