मीरा रोड : मीरा भाईंदर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस तत्कालीन नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांच्या २०१० साली झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मंगळवारी चारही आरोपींना दोषी ठरवले. बुधवारी न्यायालय आरोपींना शिक्षा सुनावणार आहे. अभिनव शैक्षणिक संस्थेतील वर्चस्वाचा वाद आणि जमीनीचा वाद ही प्रमुख कारणे या हत्येमागे होती.
मीरा भाईंदरच्या राजकारणात प्रफुल्ल पाटील यांचा मोठा प्रभाव होता. अभ्यासू व हुशार असल्याने त्यांचा प्रशासनावर, राजकीय विरोधकांवर दबदबा होता. राजकारणाव्यतिरिक्त त्यांचे पेट्रोलपंप, जमीन खरेदी व बांधकाम व्यवसाय होते. आगरी समाजाच्या अभिनव शेतकरी शिक्षण संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. या संस्थेचा सर्व कारभार त्यांच्यात हातात होता.
८ मे २०१० रोजी सकाळी पाटील हे अभिनव शाळेच्या आवारात चालत असताना कृष्णकांत उर्फ अजय पांडेय आणि गुलाम रसुल शेख यांनी त्यांच्यावर जवळून दोन गोळ्या झाडत चॉपरने २८ वार केले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाटील यांना नजिकच्या रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येने मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक असलेले विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी पाटील यांनी हत्येचा तपास केला होता.पाटील यांच्या हत्येदरम्यान त्यांचा विशाल चंद्रकांत म्हात्रे याच्याशी संस्थेच्या आवारालगतच्या खोल्यांवरुन वाद सुरु होता. पाटील हे त्यावेळी काँग्रेसचे नगरसेवक होते, तर विशाल यांचे काका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुळशीदास म्हात्रे हे महापौर होते.
पोलीसांनी या हत्येप्रकरणी काही बिल्डर, पाटील यांचे विरोधक आदी अनेकांची चौकशी केली होती. विशाल म्हात्रे याच्यासह राजेश जिलेदार सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय आणि गुलाम रसुल शेख यांना आरोपी केले होते. पांडेला भार्इंदर, तर शेखला भोपाळ येथून अटक केली होती. त्यानंतर विशाललादेखील अटक केली होती. मात्र सिंग सापडत नसल्याने त्याच्यावर १० हजारांचे बक्षिस लावण्यात आले होते. त्याची मालमत्ताही जप्त केली होती.
सिंग याला लखनऊ पोलिसांनी जून २०१२ मध्ये पकडले. लखनऊच्या जेलमध्ये तो कुख्यात बबलू श्रीवास्तव याला भेटण्याच्या प्रयत्नात होता. तेथील जेमिनी हॉटेलमध्ये तो थांबला असता, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला नवघर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. राजेश सिंग हा भाजपचे नगरसेवक मुन्ना ऊर्फ श्रीप्रकाश सिंगचा सख्खा भाऊ आहे. पांडेय व शेख हे राजेशच्याच एका संस्थेचे पदाधिकारी होते. प्रफुल्ल पाटील यांची हत्या करण्याची सुपारी विशालने राजेशला दिल्यानंतर, त्याने ही सुपारी शेख व पांडेयला दिली. त्यासाठी शस्त्रही दिले. हत्येआधी ३ दिवस दोघांनी प्रफुल्ल यांच्यावर पाळत ठेवली होती.
पोलिसांनी चारही आरोपींना मकोका लावला होता. पण विशाल याने उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर मकोका रद्द करण्यात आला. यातील राजेश, पांडेय व शेख हे तिघेही कारागृहात असून, विशाल जामिनावर सुटला होता. सुरुवातीला यात राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही झाला. परंतु पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह केलेला सखोल तपास, हत्येचे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असलेले शाळेचे दोघे रखवालदार व अन्य एकाची साक्ष आदी पुरावे तपासून, मंगळवारी न्यायाधिश जयस्वाल यांनी चारही आरोपींना दोषी ठरवले. सरकारी वकील राजा ठाकरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवताच पोलिसांनी विशालला ताब्यात घेतले.