मंगेश कराळे
नालासोपारा :- स्वस्त दरात सदनिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना अटक करण्यात यश मिळाले आहे. या फरार आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी गुरुवारी दिली आहे.
नाळा रोड गावातील श्रीखंडी येथे राहणाऱ्या हॅरेल साल्वीन (६९) यांची १३ मार्च ते ६ जुलै २०२१ यादरम्यान शुभम मिश्रा, सुरज दुबे रामसिंग देवडा, गौतम चौधरी व पुलक दास यांनी १७ लाख ५० हजार रुपये घेऊन त्या सदनिकेवर डीएचएफएल बँकेचे कर्ज असतानाही ती माहिती लपवून त्यांना सदनिकेचा ताबा किंवा दिलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली होती. नालासोपारा पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयातील वसई विरार परिसरात स्वस्त दरात सदनिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन सामान्य नागरीकांची फसवणुक करणारी टोळी सक्रीय झाली होती. सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपींचा शोध घेऊन पायबंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
या गुन्हयातील पाहिजे आरोपींचा शोध घेणे बाबत दिलेल्या सुचना व आदेशान्वये सदर गुन्हयाचा समांतर तपासा दरम्यान तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बामतीदार यांच्या मार्फतीने माहिती मिळवुन गुन्ह्यातील आरोपी सुरज कमलेश कुमार दुबे (२८) याला बुधवारी ताब्यात घेतले. त्याचेकडे प्राथमिक तपास केल्यावर त्याने त्याचे इतर साथीदारांच्या बरोबर आपआपसात संगणमत करुन स्वस्त दरात घर विकत घेऊ इच्छीत सामान्य नागरीकांना हेरुन त्यांची ५० लाख रुपयांची फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून नालासोपारा येथील १ व आचोळे येथील २ असे एकूण ३ गुन्हे उकल केले आहे. आरोपी नालासोपाऱ्यातील गुन्ह्यात अटक असून पोलीस कोठडीत आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, मसुब प्रविण वानखेडे, सागर सोनावणे, गणेश यादव आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.