- मंगेश कराळे
नालासोपारा:- पावणे आठ लाखांच्या मेफॅड्रॉन नावाच्या अंमली पदार्थासह सराईत आरोपीला अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून अंमली पदार्थांसह इतर दुसरा तीन लाखांचा मुद्देमालही हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.
नालासेापारा पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ, गुंगीकारक औषधीद्रव्ये विक्रीबाबत जातीने लक्ष घालून कारवाई करण्यासाठी वरिष्ठांनी वारंवार सुचना दिल्या होत्या. सदर आशयाचे संदर्भाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर यांना माहीती मिळाली की, एक इसम हनुमाननगर येथे रस्त्यावर एका बुलेट दुचाकीवर बसुन कोणतातरी अंमली पदार्थ विकत आहे. याबाबत वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशान्वये लागलीच कारवाई करणेकामी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक व दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी सापळा रचून आरोपीला त्याचे ताब्यातील दुचाकीसह शिताफीने पकडले.
अत्तेशाम उर्फ इतेशाम उर्फ शाम रफीक अन्सारी (४७) असे या आरोपीचे नाव आहे. सदरची दुचाकी ही त्याचीच असून दुचाकीच्या हॅन्डलला अडकवलेल्या काळया रंगाची सॅकची पाहणी केली. त्यामध्ये एका पारदर्शक प्लास्टीक पिशवीत पावणे आठ लाखांचा ७७.५० ग्रॅम मेफॅड्रॉन नावाच्या अंमली पदार्थांची पांढऱ्या रंगाची पावडर, १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम मिळुन आली. पोलिसांनी १ लाख ६० हजार रुपये किमतीची दुचाकीही जप्त केली आहे. आरोपीवर एनडीपीएसचे पूर्वीचे पाच गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन कोतमिरे, सहायक पोलिस निरीक्षक पंडीत मस्के, अमोल तळेकर, पोलीस उपनिरीक्षक अख्तर शेख, वैभव पवार, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, बनसोडे, कल्याण बाचकर, आकाश पवार, प्रेम घोडेराव यांनी केली आहे.