ठाणे - भिवंडीतील एकाची अज्ञात चोराने दगडाने ठेचून हत्या केली होती. या घटनेच्या पाच वर्षांनंतर ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने हत्या करणाऱ्या आरोपीला नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे. या आरोपीला आता निजामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास सुरू आहे.अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद मुस्ताक शेख असे असून, तो मिर्झापूर येथे वास्तव्यास होता. भिवंडीतील खोणीगाव भागातराहणारे मोहम्मद तनवीन मुस्तफा शेख यांची अज्ञात चोरट्याने हत्या केली होती. त्यानंतर, याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी प्राथमिक तपासात मोहंमद शेख याचे नाव पुढे आले होते. त्यानुसार, मागील पाच वर्षे त्याचा शोध सुरू होता. त्यानंतर, फरार आरोपी हा बिहार राज्यातील मधुबनी येथे असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ मधील पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सदर ठिकाणी जाऊन त्यांनी त्याचा तपास केला असता, तो नेपाळ सीमेवर वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, या सीमेवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, स्थानिक न्यायालयाकडून २० मे पर्यंत ट्रान्झिट रिमांड प्राप्त करून पुढील कारवाईसाठी त्याला आता निजामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता सुरू आहे. ही हत्या नेमकी कशासाठी, का करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.
हत्येतील आरोपीस नेपाळ सीमेवरून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 4:38 PM
आरोपीला आता निजामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास सुरू आहे.
ठळक मुद्देयाप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास आता सुरू आहे. ही हत्या नेमकी कशासाठी, का करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.