निखिल म्हात्रेअलिबाग -रायगड जिल्ह्यातील खोपोली, रसायनी, नेरळ परिसरात घरफोड्या, चोर्या करुन धुमाकूळ घालणार्या पुणे-रामटेकडी येथील दोन चोरट्यांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून घरफोडी, चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आले असून, 11 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या घरफोड्यांमधील अन्य दोन अट्टल चोरट्यांना शिकापूर पोलिसांनी अटक केली असून, ते पोलीस कोठडीत आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात आज (13 ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी या कारवाईची माहिती दिली. इरफान रसुल शेख (वय-30, रा. सर्व्हे नं.109, 110, नवीन म्हाडा कॉलनी, रामटेकडी, हडपसर, पुणे) व ऐलानसिंग श्यामसिंग कल्याणी (वय-31, रा.सर्व्हे नं.110, कोठारी मोटार्सच्या जवळ, रामटेकडी, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले रवीसिंग शामसिंग कल्याणी (रा.रामटेकडी, हडपसर, पुणे) व लखनसिंग रजपुतसिंग दुधाणी (रा.रामटेकडी, हडपसर, पुणे) हे दोघे शिकापूर पोलिसांच्या ताब्यात असून, शिकापूर पोलीस ठाणे येथील गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहेत.
खोपोली पोलीस ठाणे हद्दीत गेल्या महिन्यात 16 सप्टेंबर रोजी घरफोडी, चोरी झाली होती. घरफोडी, चोरीच्या घटनांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याने, हे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी आदेश केले होते. पोलीस अधीक्षक दुधे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने घरफोडी झालेल्या ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचा मागोवा घेत गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलच्या मालकाचा शोध घेण्यात आला. गुप्त बातमीदार व वानवडी पोलीस ठाणे, पुणे शहर यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजमधील चोरी करणारे संशयित निष्पन्न केले. त्यानंतर मोटारसायकल मालक इरफान रसुल शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे मोटारसायकलबाबत विचारणा केली असता सदरची मोटारसायकल ही ऐलानसिंग शामसिंग कल्याणी व रवीसिंग शामसिंग कल्याणी यांना दिल्याची कबुली त्याने दिली. त्यावरुन ऐलानसिंगला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचा भाऊ रखीसिंग शामसिंग कल्याणी व मित्र लखनसिंग रजपुतसिंग दुधाणी यांनी रायगड येथे घरफोडी, चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी दिले असल्याचीही कबुली दिली.
पोलिसांनी या प्रकरणात इरफान रसुल शेख याच्याकडून चोरीसाठी वापरलेली 35 हजार रुपये किंमतीची होन्डा कंपनीची अॅक्टीवा मोटारसायकल जप्त करत, ऐलानसिंग शामसिंग कल्याणी याच्याकडून खोपोली पोलीस ठाणे, नेरळ पोलीस ठाणे, रसायनी पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणच्या चोरीच्या गुन्ह्यातील 10 लाख 73 हजार 350 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील 3, रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील 2, नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील 5 असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. या घरफोड्यांमध्ये 11 लाख 23 हजार 100 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. यापैकी 11 लाख 8 हजार 350 रुपये किमतीचा 95 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले आहे. दरम्यान, हे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक फौजदार गिरी, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, राजेश पाटील, प्रतीक सावंत, जितेंद्र चव्हाण, शामराव कराडे, चालक पोलीस हवालदार देवराम कोरम, पोलीस नाईक राकेश म्हात्रे, पोलीस शिपाई अक्षय जगताप, महिला पोलीस हवालदार संजीवनी म्हात्रे, महिला पोलीस शिपाई जयश्री पळसकर, मोनिका मोरे, तसेच सायबर सेल शाखेचे पोलीस नाईक अक्षय पाटील, तुषार घरत, सिध्देश शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या दोघांवर दाखल आहेत घरफोडी, चोरीचे 33 गुन्हे! रायगडातील घरफोड्यांमध्ये सहभाग असलेले आणि शिकापूर पोलिसांच्या ताब्यात असलेले रवीसिंग कल्याणी व लखनसिंग दुधाणी हे अट्टल चोरटे आहेत. यापैकी रवीसिंग कल्याणी याच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीत घरफोडी, चोरीचे 11 गुन्हे दाखल असून, लखनसिंग दुधाणी विरोधात पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीत 22 गुन्हे दाखल आहेत.