मडगाव - ज्या मोलकरणीवर पूर्ण विश्र्वास टाकून सर्व घर तिच्या स्वाधीन केले त्याच मोलकरणीने थोडे थोडके नव्हे तर तब्बल साडे आठ लाखांचे दागिने लंपास करण्याची घटना घोगळ-मडगाव येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली. या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी कुडतरी येथे रहाणाऱ्या सावित्रीदेवी उर्फ दीपाली शिवदास जल्मी या 35 वर्षीय मोलकरणीला अटक केली असून घराबाहेर असलेल्या एका भंगारात काढलेल्या कपाटात लपवून ठेवलेले हे सर्व दागिनेही ताब्यात घेतले.
फातोर्डाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, सदर मोलकरणी मागची तीन वर्षे घोगळ-फातोर्डा येथील फेरेरा गार्डन्स या आलिशान प्रकल्पातील अपार्टमेंटमध्ये रहाणाऱ्या ब्रिजेश प्रभू यांच्याकडे कामाला होती. मागच्या तीन महिन्यापासून तिने घरातील दागिने चोरण्यास सुरुवात केली होती. दोघेही नवरा - बायको कामाला जातात आणि त्यावेळी घरात केवळ त्यांचे वृद्ध आई-बाप आणि लहान मुले असतात. याचाच फायदा उठवून मागचे तीन महिने हा चोरीचा प्रकार चालू होता. या प्रकरणात अटक केलेल्या त्या मोलकरणीला गुरुवारी मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी घर मालकीण स्मीता प्रभू हिच्या लक्षात आपण घरात आणून ठेवलेले मंगळसुत्र व आपल्या मुलीची एक चेन नाहीशी झाल्याचे लक्षात आल्यावर तिने फातोर्डा पोलिसात तक्रार नोंदविली. सदर सोन्याचे दागिने ज्या ठिकाणी ठेवले होते ती जागा केवळ तिच्या मोलकरणीनेच पाहिली होती. त्यामुळे संशयित म्हणून त्या मोलकरणीचे नाव पोलिसांत दिले होते. त्यानंतर बँकेत जाऊन तिने लॉकरमधील आपले दागिने तपासले असता तिथेही दागिने कमी असल्याचे तिच्या लक्षात आले.
त्यानंतर मोलकरीण सावित्री जल्मी हिला ताब्यात घेऊन पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली असता, सुरुवातीला तिने काही दाद दिली नाही. शेवटी पोलीसी हिसका दाखविल्यानंतर आपल्या चोरीची कबुली देताना हे दागिने आपण घराबाहेर ठेवलेल्या कपाटात ठेवल्याचे तिने कबूल केले. या कपाटाची झडती घेतली असता, दोन मंगळसुत्रे, एक दाऊल, सहा सोन्याच्या बांगडय़ा, दोन लहान मुलीच्या बांगडय़ा, एक माश्कोत, एक कंठहार तसेच दोन सोनसाखळ्या एवढा ऐवज सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, ज्या ज्यावेळी बँकेच्या लॉकरमधून घरात सोन्याचे दागिने आणले जात होते त्या त्यावेळी ही मोलकरीण त्यातील एक एक दागिना लांबवित होती. मात्र तिचा संशय कुणालाही आला नव्हता. सुरुवातीला तिच्या विरोधात केवळ एक मंगळसुत्र व एक चेन चोरल्याची तक्रार दिली होती. पण प्रत्यक्षात तिच्या घरासमोरील त्या कपाटाची झटती घेतली असता, तब्बल साडे आठ लाखाचे दागिने पोलिसांना सापडले.