ठाणे -पत्नीच्या खून खटल्यात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपीची शिक्षा भोगत असतांना पॅरोलच्या नावाखाली गेल्या सात वर्षापासून फरार झालेल्या दर्शन शिवदासांनी (45, रा. जुहू, मुंबई) या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5 च्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याला आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातून सात वर्षापूर्वी पसार झालेला आरोपी शिवदासांनी हा मुंबईतील अंधेरी भागात वास्तव्यास असून तो ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील गोपाल आरम हॉटेल परिसरात 2 ऑक्टोबर रोजी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास रणवरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अनिल सुरवसे, प्रशांत पवार आणि जमादार बाबू चव्हाण आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने चारित्र्याच्या संशयावरुन 2008 मध्ये पीचा ओढणीने गळा आवळून तसेच चाकूने भोसकून खून केला होता. याप्रकरणी 5 एप्रिल 2008 मध्ये त्याच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला या खून प्रकरणी मुंबई जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना 30 दिवसांच्या अभिवचन (पॅरोल) रजेवर 8 सप्टेंबर 2011 रोजी तो बाहेर आला होता. ही रजा संपूनही तो कारागृहात हजर होण्याऐवजी 2011 पासून पसार झाला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात कलम 224 प्रमाणो गुन्हा दाखल झाला होता. फरार झाल्यापासून स्वत:चे नाव बदलून हैद्राबाद आणि दिल्ली येथे जेसन फर्नाडीस या नावाने तो वास्तव्य करीत होता. पुढील तपासासाठी त्याला आता ओशिवारा पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे रणवरे यांनी सांगितले.
पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप भोगताना पॅरोलच्या नावाखाली फरार झालेला आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 9:04 PM
या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5 च्या पथकाने नुकतीच अटक केली आहे.
ठळक मुद्देनाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातून सात वर्षापूर्वी पसार झालेला आरोपी शिवदासांनीपुढील तपासासाठी त्याला आता ओशिवारा पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे रणवरे यांनी सांगितले.