मुंबई - Locanto.net या वेबसाईटवर अश्लील मजकूर अपलोड करून महिलांची बदनामी करणाऱ्या इसमास गुन्हे शाखा कक्ष ११ ने अटक केली आहे. या आरोपीचं नायब अल्पेश वल्लभदास पारेख (४७) असं असून तो मालाड येथे राहतो. तक्रारदार महिला बँक व्यवसायात नोकरीस आहे. तसेच त्या राहत असलेल्या इमारतीच्या सोसायटीचे पदाधिकारी म्हणून काम देखील पाहतात. १६ एप्रिल रोजी तक्रारदार महिला या कामावर असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने तक्रादार महिलेकडे लैंगिक सुखाबाबत, रिलेशनशिपबाबत विचारणा केली. Locanto.net या वेबसाईवर तुमचा फोटो आणि मोबाईल क्रमांकासह जाहिरात दिलेली असल्याची माहिती आरोपीने तक्रारदार महिलेला दिली. त्यानंतर महिलेस वारंवार आरोपी पारेख वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अज्ञात व्यक्तींकडून लैंगिक सुखाची मागणी करून व्हॉट्सअपवर देखील रिलेशनशिपबाबत अश्लील मेसेज करू लागला. याप्रकरणी मानसिक तणावाखाली आलेल्या महिलेले बांगूर नगर पोलीस ठाण्यात २१ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०९, माहिती व तंत्रज्ञान कायदा ६६ (क), ६७ अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ११ ने तपास सुरु केला. तपासात तक्रारदार महिला राहत असलेल्या सोसायटीच्या एका पुरुष पदाधिकाऱ्याबाबतचा अश्लील मजकूर Locanto.net या वेबसाईटवर टाकल्याचे आढळले. पोलिसांनी सोसायटीतील व्यक्तींकडे तपस केला असता सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडणुकीच्या वादातून झाल्याचे तपासात समोर आलं. तपासात क्लिष्टता असूनही तांत्रिक तपासद्वारे एका ईमेल आयडी शोधण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन अज्ञात आरोपीची माहिती प्राप्त केली आणि आज त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी पारेख हा व्यावसायिक असून त्याचा कस्टम ट्रान्सपोर्ट क्लियरिंगचा व्यवसाय आहे.