लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नागपूर येथे ईथर ट्रेड एशिया या कंपनीअंतर्गत बिट कॉइनच्या व्यवसायात करोडो रुपयांची उलाढाल होत असे. या कंपनीत मयत माधव यशवंत पवार याच्याकडे व्यवहाराचा संपूर्ण हिशेब असल्याने त्याने बिट कॉइनच्या रकमेची हेराफेरी केली. त्यामुळेच त्याचे नागपूर येथून अपहरण करण्यात आले. त्यानंतर मालेगावजवळ एका शेतात बंदुकीच्या गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी १६ सप्टेंबरला दिली.
माधव यशवंत पवार (रा. नागपूर) याचा १२ सप्टेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे शेत शिवारात नग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. पवार याची गोळी झाडून हत्या केल्यामुळे पोलीस यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली. घटनेचा मोठ्या शिताफीने तपास करण्यात आला. मयत इसम हा नागपूर येथील रहिवासी असल्याबाबत माहिती मिळताच मयताची ओळख पटवून खात्री करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक नागपूरला गेले होते. या पथकाने गोपनीय माहिती काढून मयत माधव यशवंत पवार असल्याची खात्री केली.
नजीकच्या काळात त्याच्या संपर्कात असलेले शुभम भीमराव कान्हारकर, विकल्प उर्फ विक्की विनोराव मोहोड, व्यंकेश उर्फ टोनी बिसन भगत यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिघांनाही पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, आणखी तीन साथीदारांच्या मदतीने माधव यशवंत पवार याची गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.
सदर कारवाईत पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांचे मार्गदर्शनात, अपर पोलीस अधीक्षक विजय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, प्रमोद इंगळे, अजयकुमार वाढवे, विजय जाधव, नागपूर पोलीस उपायुक्त राजमाने व पथकातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने खुनाचे रहस्य अवघ्या पाच दिवसांत उघडकीस आले. याप्रती पोलिसांचे सर्वच स्तरांतून कौतूक होत आहे.
पवार सेमिनार आयोजित करायचा
या घटनेतील मुख्य आरोपी निशिद वासनिक यांच्या मालकीच्या ईथर ट्रेड एशिया कंपनीत बिट कॉइनच्या व्यवसायात लोकांनी गुंतवणूक करावी, यासाठी मृतक माधव हा सेमिनार आयोजित करायचा. व्यवसायाचा हिशेबही तोच ठेवत असे. या व्यवसायात मृतक पवार याने बिट कॉइनच्या पैशाची हेराफेरी केल्याच्या कारणावरून आरोपींनी माधवचे त्याच्या घरून अपहरण केले. त्यानंतर त्याची वाशिम जिल्ह्यातील एका शेतात गोळी झाडून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी शुभम कान्हारकर (२२ ), विकल्प उर्फ विक्की विनोदराव मोहोड (२५), व्यंकेश उर्फ टोनी बिसन भगत (२५) (सर्व रा. आराधनानगर, खरबी, नागपूर) यांना अटक केली.