पुणे : ठाणे येथील शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापक व एका कामगाराचा खून करुन त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून फरार झालेल्याला पुण्यात पकडण्यात आले. कल्लू राजेश यादव (वय ३४, रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.याप्रकरणी बारमालक गंगाधर शिना पय्याडे (वय ६३, रा. शांती निकेतन, मालाड पूर्व) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे शबरी बार अँड रेस्टॉरंट हे हॉटेल लॉकडाऊनमुळे बंद आहे. सर्व कामगार गावी गेले असून व्यवस्थापक हरिश शेट्टी(वय ४८), मोरी कामगार नरेश पंडित (वय ५२) आणि कल्लु यादव हे तिघेच हॉटेलमध्ये होते. मॅनेजर हरिश शेट्टी व नरेश पंडित यांचा खुन करुन त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून दिलेल्या आढळून आला. त्यावेळीकल्लु यादव आढळून न आल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय होता. तो शेट्टीचा मोबाईल घेऊन पळून गेला होता. मोबाईल ट्रेस केला असता तो पुण्यात असल्याचे आढळून आले. त्यानुसार ठाणेपोलिसांनी स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधला.निलायम हॉटेलजवळील एका हॉटेलमध्ये तो उतरला होता. स्वारगेट पोलिसांनी यादव याला पकडून ठाणे पोलिसांच्या हवाली केले. स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २०१५ मध्ये मारामारी व दारुबंदीचा गुन्हा दाखलअसून तेव्हा त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली होती. कल्लु यादव याच्याविरुद्ध कोलकत्ता येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात तो तुरुंगातही जाऊन आला आहे.
कल्लु यादव याने यापूर्वी पुण्यातील हॉटेलमध्ये ८ वर्षे काम केले होते. गेल्या वर्षीपासून तो शबरी बारमध्ये कामाला होता. व्यवस्थापक शेट्टीस्वत: हॉटेलमधून जेवण मागवून खात होता. आरोपींना डाळ, भात खाण्यास देत होता. यावरुन त्यांच्या भांडणे झाली होती. तेव्हा शेट्टी व पंडित यांनी त्याला मारहाण केली होती. त्या रागातून ते दोघे झोपलेले असताना यादव याने फावड्याने त्यांच्या डोक्यावर, चेहर्यावर, गळ्यावर वार करुन त्यांचा खुन केला व त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून पळून गेला होता. जाताना तो शेट्टीचा मोबाईल स्वत: बरोबर घेतला होता. त्या मोबाईलवरुनच पोलिसांनी यादवचा माग काढत ते पुण्यात पोहचले. खून केल्यानंतर यादव मालवाहतूक आणीभाजीपाला वाहतूकीच्या वेगवेगळ्या सहा वाहनांमधून प्रवास करुन पुण्यात आला होता. येथे तो निलायम थिएटरजवळील एका हॉटेलमध्ये उतरला होता. तेथेच पोलिसांनी त्याला पकडले.