उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील करडखेल येथील एका गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्या आरोपीला महामंडळाच्या बसमधून लातूर येथे कारागृहात नेले जात हाेते. दरम्यान, सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुंगारा देत आराेपीने धूम ठाेकली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गंभीर दखल घेतली असून, दाेषी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांनी सांगितले, करडखेलपाटी येथे १७ ऑगस्ट रोजी दुपारी पैशाच्या कारणावरून हाणामारीची घटना घडली हाेती. याबाबत लखन ईश्वर कसबे (रा. करडखेल) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. त्याला उदगीर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमाेर हजर केले असता, त्यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यास गुरुवारी सायंकाळी महामंडळाच्या बसने लातूर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यासाठी पोलीस कर्मचारी राजाराम नकुलवाड, गोविंद लटपटे हे लातूरला जात हाेते. प्रवासी चढ-उतार करण्यासाठी बस करडखेल पाटी येथे थांबली. यावेळी प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत पाेलीस कर्मचारी लटपटे यांच्या हाताला जोराचा हिसका देत आराेपी हा पसार झाला.
याबाबत पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गंभीर दखल घेत राजाराम नकुलवाड, विजय हुगेवाड आणि गोविंद लटपटे या तिघांना निलंबित केले आहे. असे उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन म्हणाले.