अमरावती : शहरातील बहुचर्चित प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांडातील आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने बुधवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. राहुल बबन भड (२७ रा. मुदलीयारनगर) असे शिक्षा पात्र आरोपीचे नाव आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजता प्रतीक्षा मुरलीधर मेहेत्रे (२४, छाबडा प्लॉट) ही मैत्रिणीसोबत दुचाकीने साईनगरातील वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिरात दर्शनाकरिता गेली होती. दोघीही घरी परत जाताना मार्गात दुचाकीवर आलेल्या राहुल भड याने ओव्हरटेक करीत त्यांना अडविले. यावेळी प्रतीक्षा व राहुल यांच्यात संवाद सुरू होता. दरम्यान, राहुलने अचानक बॅगेतून चाकू काढून प्रतीक्षावर हल्ला केला. ती रक्तबंबाळ अवस्थेत कोसळली. तिच्या मैत्रिणीने मदतीसाठी आरडाओरड केली. तातडीने ओंकार मंदिर गाठून तिने घटनेची माहिती राजेंद्र येते यांना दिली. येते यांनी एका महिलेसह घटनास्थळ गाठून प्रतीक्षाला वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रतीक्षाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच प्रतीक्षाचे वडील इर्विनमध्ये पोहोचले. त्यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राहुल भड याचेविरुध्द हत्येचा गुन्हा नोंदवून शोध सुरू केला. या घटनेनंतर राहुल हा दुचाकीने दिग्रसला गेला. तेथील एका लॉजवर १५ मिनिट थांबला. पार्किंगमध्ये दुचाकी उभी करून, त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तो मूर्तिजापूर रेल्वेस्थानकाजवळील रुळावर जाऊन झोपला. दरम्यान राजापेठ पोलीस राहुल भड याच्या शोधात मूर्तिजापूरला पोहोचले. पोलिसांनी पहाटे ४ वाजता राहुल याला रेल्वे रुळावरून अटक केली. याप्रकरणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तपास पूर्ण करून २० फेब्रुवारी २०१८ रोजी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयात एकूण सात जणांची साक्ष नोंदविली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने आरोपी राहुल भड याला आजन्म कारावास, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
या निकालाने समाजाला दिशा मिळाली
प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांडात तिची मैत्रिण एकमात्र साक्षीदार होती. तिची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली. पोलिसांनी हे प्रकरण सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हाताळले. आरोपीला आजन्म कारावास ठोठावला. त्यामुळे कोणताही गुन्हा केल्यास काहीच होत नाही, हा समज या निकालाने खोडून काढला. समाजाला या निकालाच्या माध्यमातून नवी दिशा मिळाली, असे सरकारी वकील परीक्षित गणोरकर हे लोकमतशी बोलताना म्हणाले. पीडित कुटुंबांना न्याय मिळाला. पुढे फौजदारी संहितेच्या कलम ३५७ नुसार या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळेल, असे गणोरकर यांनी सांगितले.