पिंपरी : वाकड पोलिसांच्या हद्दीत शनिवारी रात्री व्यवसायिकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहेत. गोळीबार करून आरोपी मुंबई- बंगळुरू महामार्ग ओलांडून पळून गेले. आरोपी ज्या मोटारीतून ते आले होते ती मोटार तिथेच सोडून गेले असल्याने पोलिसांनी या मोटारीबद्दलची माहिती मिळविली. त्या आधारे आरोपींचा शोध घेणे शक्य झाले. मुळशीतील गुन्हेगारी टोळीतील आरोपींचा या गोळीबार प्रकरणात सहभाग असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण ज्ञानदेव काळे (कोथरूड), अभिलाष दत्तात्रय मोहोळ (शिवणे), रोहित प्रदीप देवळे, अक्षय भिमराव गोडंबे या आरोपींना अटक केली आहे तर उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार आहेत. शनिवारी रात्री साडेआकराच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या मागावर आले होते. हरिओम मेहरसिंग सिंग (वय ३०) हे फिर्यादी मुंबई- बंगळुरू महामार्गालगत वाकड हद्दीत सिगारेट घेण्यासाठी पान टपरीवर थांबले असता, आरोपी त्यांच्या मोटारीत बसले. फिर्यादी मोटारीत आले. त्यावेळी आरोपींनी त्यांना पिस्तुल दाखविले. फिर्यादी मोटारीतून बाहेर पडून आरडा ओरडा करत पळू लागले. त्यावेळी हल्लेखोरांनी पिस्तुलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडली. फिर्यादी सिंग यांच्या मांडीतून गोळी आरपार गेली. ते जखमी झाले. आरडा ओरडा करताख नागरिक जमा झाल्याने हल्लेखोर त्यांनी आणलेली मोटार तेथेच सोडून पळुन गेले. पोलिसांनी या घटनेच्या तपासात घटनास्थळाजवळ उभ्या असलेल्या मोटारीबद्दल माहिती मिळवली. त्यावेळी आरोपींची माहिती पोलिसांच्या हाती लागली. दोन दिवसात पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेतला. ......................बनावट फेसबुक अकाऊटंचा वापर हल्लेखोरांनी बनावट फेसबुक अकाऊंट उघडून फिर्यादीस फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दक्षिणेतील अभिनेत्रीच्या छायाचित्राचा डीपी लावुन ते फिर्यादीच्या संपर्कात होते. शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश मिळवुन देण्याचे, परदेशात अभ्यासक्रमास प्रवेश मिळवुन देण्याचे काम करीत असल्याची माहिती आरोपींनी मिळवली. त्याच्याकडून मोठी रक्कम उकळता येईल, या दृष्टीने त्यांनी योजना आखली. फिर्यादी काही दिवस परगागवी गेले असल्याने आरोपींनी ते परत येण्यापर्यंत प्रतिक्षा केली. फेसबुकच्या माध्यमातून ते फिर्यादीच्या संपर्कात होते. फिर्यादी परगावहून येताच आरोपी त्यांच्या मागावर राहिले. शनिवारी त्यांनी फिर्यादीला धमकावुन लुटण्याचा प्रयत्न केला. फेसबुकच्या माध्यमातून आरोपींनी सावज शोधल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,वाकड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी गोळीबार प्रकरणी पोलीस पथकाने केलेल्या तपासाची माहिती दिली. तपास पथकातील पोलिसांचे कौतुक केले.
गोळीबार प्रकरणातील आरोपी मोटार सोडून पळाल्याने सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 5:28 PM
आरोपी ज्या मोटारीतून ते आले होते ती मोटार तेथूच सोडून गेले असल्याने पोलिसांनी या मोटारीबद्दलची माहिती मिळविली.
ठळक मुद्देवाकड पोलिसांच्या हद्दीत शनिवारी रात्री व्यवसायिकावर गोळीबारबनावट फेसबुक अकाऊटंचा वापर