नवी मुंबई - सहावी ते आठवीच्या १७ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेला शिक्षक आईच्या शिफारशीवरून सदर शाळेत नोकरीला लागल्याचे समोर आले आहे. त्याची आई पूर्व शिक्षिका असून, तो अविवाहित आहे. एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी संगणक शिक्षकाची नोकरी करत होता.
अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी ३१ वर्षीय खासगी संगणक शिक्षकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तो डोंबिवलीचा राहणारा असून अविवाहित आहे. संगणक प्रशिक्षण घेतल्यानंतर २००९ पासून त्याने संगणक शिक्षक म्हणून ठिकठिकाणी नोकरी केली आहे. एका खासगी सामाजिक संस्थेमार्फत तो पालिका शाळेत चार महिन्यांपासून संगणक शिक्षकाची नोकरी करत होता. यादरम्यान शाळेने ठरवलेल्या वेळापत्रकाव्यतिरिक्त वेळी मुलींना प्रशिक्षणासाठी बोलावून तो त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होता. त्यामध्ये दिव्यांग मुलीचाही समावेश आहे. काही विद्यार्थिनींनी ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित संस्थेला त्याची माहिती दिली. यानुसार संस्थेने त्याला नोकरीवरून निलंबित करून त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली.
शिक्षक बनला हैवान! पालिका शाळेत केला १४ विद्यार्थिनींचा विनयभंग
त्याआधारे पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. तो आईच्या नावाचा वापर करून सदर शाळेत नोकरीला लागला होता. त्याच्या आईने सदर शाळेत काम केलेले असल्याने त्याच शाळेत संगणक शिक्षक म्हणून नोकरीची संधी देण्याची मागणी त्याने संस्थेकडे केली होती. तत्पूर्वी दोन महिने तो संबंधित संस्थेच्या कार्यालयातच अकाउंटचे काम पाहत होता; परंतु टॅली फारसे जमत नसल्याने संस्थेचे वरिष्ठही त्याच्यावर नाखूश होते. दरम्यान, संबंधित पालिका शाळेत संगणक शिक्षकाची कमतरता भरून काढण्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी त्याने इतरही चार ठिकाणी शाळांमध्येच संगणक शिक्षकाची नोकरी केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये कामोठेतील एका शाळेसह डोंबिवली, ठाणो व इतर ठिकाणच्या खासगी शाळांचा समावेश आहे. त्या ठिकाणीही त्याने अशा प्रकारची कृत्ये केल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यानुसार पोलिसांकडून त्याच्या पूर्व कामांच्या ठिकाणीही चौकशी केली जाणार आहे. यामध्येही त्याची अशी कृत्ये समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.