योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: २०१८ साली घडलेल्या एका खुनाच्या आरोपीला तब्बल सहा वर्षांनंतर अटक करण्यात यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
जहूर खान वल्द रहीम खान (६०, बजराज नगर, झारसुगडा, ओडिसा) असे आरोपीचे नाव आहे. १९ मार्च २०१८ साली जहुरने त्याच्या २१ साथीदारांसोबत शेख इक्बाल उर्फ शेख जमील (३७, रामगड, आनंदनगर, कामठी) याच्या घरावर हल्ला करत शस्त्रांनी वार केले होते. त्यात शेख इक्बालचा मृत्यू झाला होता. तर त्यात समीर शेख, जहीना बी व फिर्यादी शेख अल्ताफ शेख जमील गंभीर जखमी झाले होते. आरोपींविरोधात नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी पोलिसांनी २० आरोपींना अटक केली होती व दोन जण फरार होते. गुन्हे शाखेच्या पथकाला जहूर खान रामगडमध्ये आला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने हत्या केल्याची बाब कबूल केली. त्याला पुढील कारवाईसाठी नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल शिरे, आशिष कोहळे, राजेश लोही, रामनरेश, गौतम रंगारी, राजू टाकळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.