लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे अमरावतीचे केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्या कटात सहभागी असलेल्या आरोपीला आर्थर रोडमधील पाच कैद्यांनी मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. शाहरुख पठाण, असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी पाच कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आर्थर रोड कारागृहात शाहरुख पठाण व इतर कैद्यांमध्ये कोणाला कोणत्या कारणावरून अटक झाली यावर चर्चा झाली. उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी शाहरुख पठाणला अटक झाल्याचे समजताच आरोपी कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण चव्हाण ऊर्फ आवन व संदीप जाधव यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली. यामध्ये पठाणच्या हाताला व गळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर कारागृह रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारागृह प्रशासनाने पठाणवर हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कारागृह अधिकारी अमोल चौरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारागृहाची शांतता भंग करणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कारागृहातून अन्यत्र हलविण्याची आरोपींची विनंती शाहरुख पठाणला झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींनी आपल्याला आर्थर रोड कारागृहातून अन्य कारागृहात हलविण्याची विनंती विशेष एनआयए न्यायालयाला केली. घटनेचा अहवाल कारागृह प्रशासनाने न्यायालयात सादर केला, तसेच जिवाला धोका असल्याने आरोपींनी अन्य कारागृहात हलविण्याची विनंती केल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी विशेष न्यायालयाला सांगितले.
सुनावणी तहकूब आर्थर रोड कारागृहाला आरोपींची विनंती मान्य आहे आणि एनआयएलाही काही हरकत नाही, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने आरोपींना अन्य कोणत्या कारागृहात हलविण्यात येऊ शकते, यासंदर्भात अन्य कारागृह अधिकाऱ्यांकडून उत्तर मागत सुनावणी तहकूब केली.