मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून ११ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी दिली आहे.
एव्हरशाईन सिटी येथील स्टार रेसिडेन्सी कॉम्प्लेक्समध्ये राहणारे मंगेश शंकर चव्हाण (४२) हे १९ जूनला पहाटे साडेपाचच्या सुमारास ड्रीमलॕण्ड हाॅटेलमागे, स्मशानभूमी रोड परिसरात मॉर्निंग वॉक करत होते. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली होती. आचोळे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयात एकाच दिवशी सलग एकापाठोपाठ ३ चैन चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे अशा गुन्हयांना आळा घालणे व घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी तात्काळ मार्गदर्शन व सुचना देवून पथके रवाना केली. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखाचे अधिकारी व अंमलदार यानी घडणाया प्रत्येक चैन स्नॅचिंग गुन्हयाचे घटनास्थळी भेटी देऊन तांत्रिक विश्लेषण केले. या गुन्हयातील आरोपीचा आंबिवली पर्यंत माग घेण्यात आला. आरोपीबाबत माहिती मिळाल्यावर आरोपी अली हसन अफसर उर्फ अबु जाफरी (२४) हा निष्पन्न झाला. वरिष्ठांचे मार्गदर्शनाने आंबिवलीतील ईराणी वस्तीमध्ये आरोेपीच्या ठिकाणाची माहिती काढून स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपीच्या राहत्या घरी सापळा कारवाई केली. आरोपी घराच्या मागील खिडकीतून उडी मारुन आंबिवली येथील जंगलाच्या दिशेने पळून गेला. पोलीस पथकाने आरोपीचा जंगलाच्या दिशेने पाठलाग केला. पोलीस हवालदार शिवाजी पाटीलने दलदलीत लपलेल्या आरोपीला शिताफिने ताब्यात घेतल्यावर त्यांच्यात झटापटी झाली. आरोपीकडे पोलीस कोठडीदरम्यान तपास केल्यावर चेन जबरी चोरीचे ७ गुन्हे, मोबाईल जबरी चोरीचे २ गुन्हे व गुन्हयात चोरी करण्याकरता वापरलेली दुचाकीसह, वाहन चोरीचे २ गुन्हे असे एकुण ११ गुन्हे उघड केले. गुन्हयात चोरीस गेलेले ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने, २ मोबाईल फोन व २ दुचाकी असा एकुण ५ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द यापुर्वी ठाण्यात हद्दीत जबरी चोरी व वाहन चोरीचे ९ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश आंबुरे, सहा. पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, राजाराम काळे, सतिश जगताप, आसिम मुल्ला, महेश वेल्हे, संग्राम गायकवाड, अनिल नागरे, जयकुमार राठोड, हनुमंत सुर्यवंशी, मनोहर तावरे, सुनिल कुडवे, राजविर संधु, प्रविण पवार, संतोष चव्हाण, मसुब जवान सचिन चौधरी यांनी केलेली आहे.