अमरावती : लघु चित्रपट निर्मित करणाऱ्या एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिका-याशी फेसबुकवर मैत्री करून त्यांना ७ लाख ७९ हजारांने गंडविणा-या आरोपीला शहर सायबर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी अटक केली. हार्दिक आश्विनसींह पवार (३१, रा. राघव होस्टेल दाहोद, गुजरात राज्य ), असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून एक कार, महागडी घड्याळ, चार महागडे मोबाईल, एटीएमकार्ड, ५० हजार रुपये असा एकूण ७ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सायबर पोलिसांची ही मोठी कामगिरी मानली जात आहे.
एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी मुकुंद ढेरे यांनी २९ सप्टेंबर रोजी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. ते निर्मित करीत असलेल्या लघु चित्रपटाकरिता एका अभिनेत्रीची त्यांना आवश्यकता होती. त्यामुळे त्या अभिनेत्रीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेत असताना पूजा पटेल नावाने फेसबुकवर अकाऊंट असलेल्या व्यक्तीने त्यांच्यासोबत फेसबूक, मॅसेंजर तसेच व्हॉट्सअॅवर संपर्क साधून लघु चित्रपटात रोल करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने फियार्दीला वेगवेगळी कारणे सांगून १० ते १४ सप्टेंबर दरम्यान फियार्दीकडून आॅनलाईन ७ लाख ७९ हजार ७७ रुपये प्राप्त करून फसवणूक केली.
फियार्दींना नि:शस्त्र या नावाने महिलांवरील होणा-या अत्याचाराबाबत लघु चित्रपट तयार करायचा होता. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी या गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश सायबर पोलिसांना दिले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपी हा गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळताच शहर सायबरचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, एपीआय रविंद्र सहारे, पोलीस शिपाई चैतन्य रोकडे, दीपक बदरके यांचे पथक २० आॅक्टोबरला गुजरातला रवाना झाले.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने दाहोत गुजरात येथे एकाचवेळी त्यांनी दोन ठिकाणी छापे मारून गुन्ह्यात वापरलेया बँक स्टेटमेंटवरून आरोपी हार्दिक अश्विीनसिंह पवार याला (३१, रा. राघव होस्टेल मागे रामनगर सोसायटी दाहोद) येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने फसवणूक करून मिळविलेल्या रकमेतून काही मोबाईल, वाहन खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याच्या ताब्यातून एक महागडी कार, घड्याळ, चार मोबाईल, रक्कम असा ७ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह, उपआयुक्त यशवंत सोळंके, एसीपी लक्ष्मण भोगन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, एपीआय रवींद्र सहारे व पथकाने केली.