मंगेश कराळे
नालासोपारा :- अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका नायजेरियन महिला आरोपीला तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २ करोड रुपयांचे १ किलो मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त केला आहे.
गुरुवारी तुळींजचे पोलीस अंमलदार पांडुरंग सगळे यांना माहिती मिळाली की, प्रगती नगरच्या एस पी अपार्टमेंटच्या समोर एक नायजेरियन महिला अंमली पदार्थाची विक्री करत आहेत. सदरबाबत तुळींज विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडून कारवाई करणेबाबत आदेश प्राप्त केला. तुळींजचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचून नायजेरियन आरोपी महिला ईडका जोसेफ (३०) हिला ताब्यात घेतले. तिची झडती घेतल्यावर २ करोड रूपये किंमतीचे १ किलो वजनाचे मेफेड्रोन अंमली पदार्थ मिळून आला आहे. तसेच मोबाईल, पिशव्या असा एकूण २ करोड १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तुळींज पोलिसांनी एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. जप्त मुद्देमाल कोठुन खरेदी केला याबाबत आरोपीकडे चौकशी करत आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, इस्माईल छपरीबन, राहुल कदम, सगळे, राजगे, बागुल, अमोल बर्डे यांनी केली आहे.