राजापूर : तालुक्यातील केळवडे गावाच्या जवळील जंगलामध्ये गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व नंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दिपक ऊर्फ बाबू राजाराम या व्यक्तीच्या संशयीत मृत्यू प्रकरणाचा उलघडा करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आलेले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसानी संजय उर्फ बंडा महादेव गुगे याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने गुगे यास १४ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
राजापूर तालुक्यातील केळवडे, वरचीवाडी, ता . राजापूर येथील दिपक ऊर्फ बाबू राजाराम गुरव हे गावाजवळील जंगलामध्ये गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले होते. त्यांना उपचाराकरीता प्रथम सिंधुदुर्ग येथील एका खाजगी रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते. दिपक ऊर्फ बाबू गुरव यांच्यावर सिंधुदुर्ग येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना डॉक्टरांनी दिपक गुरव यांच्या डोक्यात बंदुकीचे छर्रे असण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावेळी सदर प्रकरणाबाबतची माहिती रत्नागिरी पोलीसांना मिळताच पोलिसांनी फिर्यादींच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला व तपासास सुरुवात केली. गुरव यांना रत्नागिरी येथे उपचारार्थ नेत असताना त्यांचा रत्नागिरी येथील रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
पोलीस अधिक्षकांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा वेगाने तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांची पाच तपास पथके तयार करण्यात आली. दर तपास पथकांनी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने माहीती घेऊन, पुरावे प्राप्त करणे व आरोपीचा शोध घेण्याचे काम सोपविण्यात आले. गुन्ह्याचे घटनास्थळ हे डोंगराच्या उतारावरील जंगलमय भागातील निर्जन स्थळी असल्याने तसेच गुन्ह्याच्या घटनास्थळी कोणताही पुरावा मिळत नसल्याने सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते . गुन्ह्यात बळी गेलेल्या इसमास बंदुकीची गोळी लागल्याने , पोलीसांनी घातपाताच्या दृष्टीने तपास करीत , घटनास्थळाच्या आसपासच्या गावातील बंदुक बाळगणाऱ्या लोकांची माहिती घेतली. सदर संशयीत लोकांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे प्रत्यक्ष चौकशी केली. त्यामध्ये केळवडे गावातीलच वरच्यावाडीमध्ये रहाणारा संशयीत इसम संजय उर्फ बंड्या महादेव मुंगे याचेकडे एक काडतुसीची बेकायदेशीर बंदुक असल्याची खात्रीशीर माहिती पोलीसांना मिळाली. तेव्हा पोलीसांनी मुगे यास पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच खून केल्याचे समोर आले.