मंगेश कराळे
नालासोपारा - विरारच्या आयसीआयसीआय बँकेत २९ जुलै २०२१ मध्ये रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिल दुबेने बँक मॅनेजर आणि रोखपाल या दोन्ही महिलांवर जबरी चोरीच्या इराद्याने खुनी हल्ला केला होता. या हल्ल्यात बँक मॅनेजर यांचा मृत्यू झाला तर रोखपाल यांना गंभीर दुखापत झाली. आरोपीने चोरलेले १ करोड ३८ लाखांचे रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी विरार पोलिसांनी हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. आरोपी अनिल दुबे हा तेव्हापासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे. शुक्रवारी दुपारी आरोपी तारीख असल्याकारणाने ठाणे जेलमधून वसई न्यायालयात आणण्यात आले होते. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास आरोपीला बाथरूमला नेण्यात आल्यावर एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा हात झटकून आरोपी न्यायालयाच्या परिसरातून पळून गेला आहे.
बँक मॅनेजर योगिता चौधरी (३६) आणि रोखपाल श्वेता देवरूख (३२) यांच्यावर आरोपी अनिल दुबेने जबरी चोरी करण्याच्या इराद्याने धारधार हत्यारानिशी बँकेत येऊन व्यवस्थापक योगिता चौधरी यांच्या गळ्यावर व इतर ठिकाणी वार करत गंभीर दुखापती करून जीवे ठार मारले व चोरीला विरोध करणाऱ्या रोखपाल श्रद्धा देवरुखकर यांच्या गळ्यावर, शरीरावर इतर ठिकाणी वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर खुनी हल्ल्याचा आणि दरोड्याचा १४ मिनिटांचा हा थरारक प्रकार बँकेच्या आतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला आरोपी कोर्टाच्या परिसरातून पळून जाण्यात आरोपी यशस्वी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. वसई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू असून त्याचा शोध सुरू केला आहे.