वाशिम : वाडा फॉर्म, मंगरूळपीर येथील खून प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने २३ फेब्रुवारी रोजी जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
२ डिसेंबर २०१२ रोजी आरोपी गोपाल शेषराव पाटील रा. मंगळसा (ता.मंगरूळपीर) याने अजय महादेव खडसे (१८) रा. वाडा फॉर्म यास ३० नोव्हेंबर २०१२ ते २ डिसेंबर २०१२ या दरम्यान धारदार शस्त्राने मारून जिवाने ठार केले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत विहिरीत फेकून दिले, अशी फिर्याद विजय महादेव खडसे (२२) याने मंगरूळपीर पोलीस स्टेशनला दिली होती. या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालिन तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक एस.एल. दोनकलवर यांनी करून सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालय मंगरूळपीर येथे न्यायाधिश रचना आर. तेहरा यांच्या समक्ष २३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हा खटला चालला. न्यायाधिश तेहरायांनी दोन्ही पक्षाची बाजू एकून घेवून आरोपी गोपाल शेषराव पाटील दोषी आढळून आल्याने त्यांना कलम ३०२ मध्ये जन्मठेप व नगदी एक हजार रूपये दंड व तसेच भादंवी कलम २०१ मध्ये ३ वर्ष कारावास व नगदी ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड.पी.एस.ढोबळे यांनी काम पाहिले.