MP News : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नाच्या 30 वर्षानंतर एका महिलेने आपल्या पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. यामुळे दुखावलेल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अवधपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 52 वर्षीय राजीव गिरी सौम्या स्टेट कॉलनीत राहत होते. मूळ रायसेन जिल्ह्यातील राजीव यांचा विवाह 30 वर्षांपूर्वी जानकी गिरी या महिलेशी झाला होता. आता लग्नाच्या तीस वर्षांनंतर 26 जानेवारी रोजी पत्नीने महिला पोलिस ठाण्यात राजीव यांच्याविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला.
या आरोपानंतर राजीव प्रचंड तणावात गेले. 5 दिवस अस्वस्थ राहिल्यानंतर त्यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी आत्महत्या केली. मृत राजीव गिरी यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. मुलीचे लग्न झाले आहे, तर मुलगा 25 वर्षांचा आहे.
महिला नवऱ्याला तशाच अवस्थेत सोडून गेली ...
अवधपुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी रतन सिंह परिहार यांनी सांगितले की, या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, राजीव जेव्हा विष प्राशन करुन हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाची झुंज देत होते, तेव्हा पत्नीने पोलिस स्टेशन गाठून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. आपला पती केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता, त्यामुळे तिने विष प्राशन केल्याचे पत्नीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी सुरू केला तपास पोलिसांनी ताबडतोब एका कॉन्स्टेबलला हॉस्पिटलमध्ये पाठवले, जेणेकरून राजीव यांची साक्ष नोंदवता येईल. परंतु, ते स्टेटमेंट देण्याच्या स्थितीत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर अर्ध्या तासात राजीवचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.