बारामती : शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण पोलिसांनी आणलेला आरोपी पोलिसांच्या हाताला हिसका देवुन पळुन गेल्याचा प्रकार बुधवारी(दि ६) सायंकाळी घडला.या प्रकारामुळे पोलिसांची कार्यक्षमता उघड झाली आहे. हिसका देवुन पळुन जाण्यापर्यंत आरोपींची मजल गेल्याने पोलिसांचे बळ क्षीण झाल्याची चर्चा शहरात होती.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी अमोल ज्ञानदेव नरुटे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.सोन्या उर्फ सोनल गणेश इंगळे (वय १९, रा. तांदूळवाडी, बारामती) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी(दि ६) सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सोन्या उर्फ सोनल गणेश इंगळे याच्यासह भीमराज बबन गायकवाड, गणेश उर्फ प्रेम सचिन रणपिसे, प्रमोद उर्फ पिंटू आण्णा गावडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या आरोपींना बारामती उपकारागृहातून पुण्याच्या येरवडा कारागृहात वर्ग करण्याचा तोंडी आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला होता. तसेच खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी किशोर उर्फ बाबू विजय भापकर (वय २६ , रा. मेडद, ता.बारामती) याची रवानगी येरवडा कारागृहात करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले होते. त्यामुळे या सर्व आरोपींनी घेवून पोलिस कर्मचारी खासगी वाहनाने येथील सिल्व्हर ज्युबिली शासकिय रुग्णालयात आले. यावेळी आरोपी इंगळे याने माज्या पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्याने शौचाला येत आहे,त्यासाठी स्वच्छता करण्याचा बहाणा केला. त्यासाठी पोलिस कर्मचारी नरुटे हे त्याला घेवून शौचालयाकडे गेले. तो बाहेर आला असताना हाताला पकडून त्याला घेवून निघाले होते.यावेळी आरोपी नरुटे यांच्या हाताला हिसका देत तेथून पळुन गेला.आरोपी पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला आहे.अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पद्मराज गंपले करत आहेत.
पोलिसांचे बळ पडले क्षीण; वैद्यकीय तपासणीला आणलेला आरोपी पळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 5:30 PM