डोंबिवली - खासगी रुग्णालयातील सफाई कामगार यशवंत चव्हाण हे डोंबिवलीहून कल्याणला घरी परतत असताना खंबाळपाडा रोडवरील सार्वजनिक शौचालयाजवळ दोघा अनोळखी व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजता घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या घटनेला चार दिवसांचा कालावधी लोटूनही यातील आरोपी अद्याप मोकाट आहेत.महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेल्या किसन घावरी यांच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून घावरी यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चव्हाण यांचे वडील भोला हे केडीएमसीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून निवृत्त झाले असून त्यांच्या जागी कामाला लावण्यासाठी घावरी यांनी पाच लाख रुपये घेतले होते. पण बरेच दिवस काम न केल्याने चव्हाण यांचा घावरी यांच्याशी वाद झाला होता. फसवणूक झाल्याप्रकरणी चव्हाण यांनी घावरी यांची महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीवरून बदली झाल्याच्या रागातून घावरी यांनी दोन अनोळखी व्यक्तींच्या मदतीने ही मारहाण केल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. चव्हाण यांच्या तक्रारीवरून घावरी आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रार दाखल होऊन चार दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही. यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. या प्रकाराबाबत सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.सखोल चौकशी व्हावीयशवंत चव्हाण यांचे सेवानिवृत्त वडील भोला चव्हाण यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार करून किसन घावरी याने पैसे घेऊन केलेल्या फसवणुकीची तक्रार केली आहे. या पत्रावरून घावरी यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी यशवंत यांचा मेव्हणा हितेश गोहिल यांनी केली आहे. मानपाडा पोलिसांनीही लवकरात लवकर आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी याकडेही गोहिल यांनी लक्ष वेधले आहे.
सफाई कामगार हल्ला प्रकरणातील आराेपी अद्याप माेकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 12:55 AM