माणगाव - आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने आरोपीसजन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पीडीतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. आरोपीला 14 वर्ष आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास १ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे.युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण असे शिक्षा सुनावलेल्या आराेपीचे नाव आहे.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, यातील पिडीत फिर्यादी व तिची पिडीत बहिण हे आदिवासी समाजाचे असून आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण यांचेकडे आंब्याचे बागेमध्ये राखणीकरीता कामावर होत्या. आरोपीत याने फिर्यादी हिस मारहाण करून व तिचे मुलाला व आजीला मारून टाकण्याची धमकी देवून जबरदस्तीने वेळोवेळी पाभरे तांबडी, घोणसे, म्हशाची वाडी येथे शारिरीक संबंध केले होते. ती गरोदर राहताच तिचा गर्भपात घडवून आणला. तसेच आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण याने फिर्यादीच्या लहान बहिणीसोबत देखील लैंगिक अत्याचार केले होते.
या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार श्रीवर्धन यांनी केला. आरोपीविरूध्द् न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी माणगावच्या विशेष न्यायालयात पार पडली. पिडीत मुलींसह वैद्यकिय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. या खटल्यामध्ये सहायक सरकारी वकील योगेश तेंडूलकर, जे.डी.म्हात्रे, अतिरीक्त सरकारी अभियोक्ता यांनी सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासले.