जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या भगवान हिरामण सपकाळे (५०, रा. भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर, पुणे येथून अटक केली. १६ वर्षांपासून तो फरार असल्याने उच्च न्यायालयाने त्याला पकडण्याचे आदेश जारी केले होते.
भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९९७ मध्ये झालेल्या खुनात भगवान सपकाळे आरोपी होता. त्याला न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना २ जून २००६ रोजी त्याला पॅरोल रजा मंजूर झाली होती. ही रजा संपल्यानंतर कारागृहात हजर न होता सपकाळे फरार झाला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्याला फरार घोषित केले होते. जे आरोपी पॅरोल रजेवर हजर झाले नाहीत त्यांना फरार घोषित करून उच्च न्यायालयाने त्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी अशा आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.
१६ वर्षांपासून फरार असलेला सपकाळे हा पुण्यातील शिरूर भागात असल्याची माहिती निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अमलदार लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, किशोर राठोड, विनोद पाटील व मुरलीधर बारी यांचे पथक पुण्यात रवाना केले होते. बुधवारी पथकाने त्याला ताब्यात घेतले. गुरुवारी जळगावात आणल्यानंतर भुसावळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सपकाळे हा पत्नीसह तेथे वास्तव्यास होता. गवंडी काम करीत होता.