लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तात्या टोपेनगरातील उद्यानासमोर ठेवलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात अखेर बजाजनगर पोलिसांनी यश मिळवले. शहाबाज अशपाक शेख (वय १९) असे त्याचे नाव आहे. तो खामल्यातील रहमतनगरात राहतो.संजय सदूजी सोमकुंवर (वय ४८, रा. सुरेंद्रनगर, तात्या टोपेनगर) यांच्याकडे १ जानेवारी २०२० ला साक्षगंधाचा कार्यक्रम होता. त्यासाठी ठिकठिकाणचे नातेवाईक, पाहुणे त्यांच्याकडे आले होते. घराशेजारीच कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी आपली वाहने बाजूच्या उद्यानाजवळ पार्क केली. कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री ही मंडळी परत आली असता त्यांना चार वाहनांची तोडफोड झाल्याचे दिसले. यात छत्तीसगडमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारचाही समावेश होता. तोडफोड करणाऱ्या आरोपींबाबत कसलेही पुरावे किंवा स्पष्ट माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळाली नव्हती. सीसीटीव्ही फुटेजमध्येही काही स्पष्ट दिसत नव्हते. तरीदेखील बजाजनगर ठाण्यातील कर्मचारी नायक प्रफुल्ल पवार आणि शिपायी सतीश खडसे यांनी तब्बल अडीच महिने कसोशीने प्रयत्न करून आरोपीला हुडकून काढले. शहबाज याच्या गुरुवारी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त व्ही. एन. मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राघवेंद्रसिंग क्षीरसागर, सहायक निरीक्षक बी. बी. तांबे, नायक प्रफुल्ल पवार, सतीश खडसे आणि जितेंद्र जनकवार यांनी ही कामगिरी बजावली.वड्याचे तेल वांग्यावरआरोपी शहबाज हा काडीबाज स्वभावाचा आहे. त्याने नको असलेली गोष्ट इकडची तिकडे केल्यामुळे त्याच्या मित्राचा आणि मित्राच्या प्रेयसीचा वाद झाला. त्यांचे ब्रेकअप झाले. शहबाजमुळे हे सर्व घडल्याचे माहित पडल्यामुळे चार पाच मित्रांनी त्याची बेदम धुलाई केली होती. त्याचा अपमान आणि राग मनात धरून आरोपी शहबाजने बाजूच्या सिमेंटच्या फळीने या वाहनांची तोडफोड केल्याचे पोलीस तपासात सांगितले.
नागपुरात वाहनांची तोडफोड करणारा आरोपी अखेर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:40 PM
तात्या टोपेनगरातील उद्यानासमोर ठेवलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात अखेर बजाजनगर पोलिसांनी यश मिळवले.
ठळक मुद्देअडीच महिन्यानंतर पोलिसांनी बांधल्या मुसक्या : बजाजनगर पोलिसांची कारवाई